तलाव परिसरातील निर्माल्याचीही केली स्वच्छता : महापालिकेची तत्परता
बेळगाव : श्री विसर्जन मार्गावर निर्माण झालेल्या कचऱ्याची उचल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळनंतर निर्माण झालेला कचरा पहाटेच्या दरम्यान स्वच्छ करण्यात आला. त्याचबरोबर जक्कीन होंड्यासह विविध तलावांच्या परिसरात टाकण्यात आलेल्या निर्माल्याचीही उचल करण्यात आली. महापालिकेने शहर स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिल्याने गणेश भक्तांतून समाधान व्यक्त करण्यात आले. गणेशोत्सव व विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. या पूर्वीच विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यासह खाली आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. एकूण 9 विसर्जन तलावांवर 24 क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. मंडप, विद्युतरोषणाई तसेच लाऊड स्पीकरचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.
कपिलेश्वर जुन्या व नव्या तलावांच्या ठिकाणी दोन टप्प्यात मनपाचे शंभर व अधिकारी तैनात होते. कपिलेश्वर तलाव परिसरातील निर्माल्याची उचल करण्यासाठी तीन ऑटो टिप्पर, दोन मिनी कॉम्पेक्टर तैनात करण्यात आले आहेत. तर जक्कीन होंड येथील निर्माल्याची उचल करण्यासाठी एक मोठा कॉम्पेक्टर व एक टिप्परची व्यवस्था करण्यात आली होती. सफाई कर्मचाऱ्यांचे 20 जणांचे पथकाने तीन टप्प्यात स्वच्छता केली. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच महापालिकेकडून शहरात दोन वेळा स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले होते. विसर्जन मार्गावर कचरा निर्माण होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती. रस्त्यावर पडलेला कचरा गोळा करून तातडीने तो वाहनात भरण्यात येत होता. त्यामुळे कचऱ्याची समस्या दूर हाण्यास मदत झाली. सफाई कर्मचारी पहाटेपासूनच शहर स्वच्छतेच्या कामात व्यस्त असताना दिसून आले. त्यामुळे गणेश भक्तांतून समाधान व्यक्त करण्यात आले.









