वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱ्या आशिया चॅम्पियन्स करंडक तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघ मानसिकदृष्ट्या अधिक बलवान आणि भक्कम करण्यासाठी हॉकी इंडियाने आता दक्षिण आफ्रिकेचे मनस्थिती सुधारणा तज्ञ पॅडी अपटोन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर माहिती हॉकी इंडियाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेचे मनस्थिती सुधारणा तज्ञ पॅडी अपटोन यांनी यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाबरोबर काम केले आहे. आता ते भारतीय हॉकीपटूंची मनस्थिती अधिक भक्कम आणि मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करतील. येत्या शनिवारपासून बेंगळूरच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या केंद्रामध्ये (साई) निवडण्यात आलेल्या भारतीय संभाव्य हॉकी संघातील खेळाडूंकरीता राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर तीन सत्रांमध्ये होणार आहे. या सराव सत्रामध्ये पॅडी अपटोन यांचे भारतीय हॉकीपटूंना मनस्थिती सुधारणा घडविण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन होणार आहे. आगामी दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाला यशस्वी होण्याकरीता मानसिकता भक्कम राखणे गरजेचे आहे. 2011 साली दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. कर्स्टन यांच्या प्रशिक्षक वर्गामध्ये पॅडी अपटोन यांचाही समावेश होता. अपटोन यांच्या भारतीय क्रिकेट संघाला लाभलेल्या मार्गदर्शनामुळे भारतीय क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये कसोटी मानांकनात पहिले स्थान मिळविण्याचा पराक्रम केला आहे. त्यानंतर काही दिवस भारतीय क्रिकेट संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील मानांकनात अग्रस्थानावर होता.









