पूजा खेडकर प्रकरणाशी संबंध नसल्याची स्पष्टोक्ती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
युपीएससीचे (केंद्रीय लोकसेवा आयोग) अध्यक्ष मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर सामाजिक आणि धार्मिक कार्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी 16 मे 2023 रोजी युपीएससीचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती. 14 दिवसांपूर्वी त्यांनी आपला राजीनामा कार्मिक विभागाकडे (डीओपीटी) पाठवला होता. याबाबतची माहिती शनिवार, 20 जुलैला समोर आली आहे. राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. त्यांचा कार्यकाळ मे 2029 पर्यंत असल्याने त्यांना राजीनामा मंजुरीची अजूनही प्रतीक्षा आहे.
राजीनाम्याची माहिती समोर आल्यानंतर मनोज सोनी यांनी आपला राजीनामा प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या वादांशी आणि आरोपांशी संबंधित नसल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी, काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर वेगळेच भाष्य केले आहे. युपीएससीशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पदावरून हटवण्यात आल्याचे वक्तव्य रमेश यांनी केले.
मनोज सोनी यांच्या कार्यकाळात आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर आणि आयएएस अभिषेक सिंह वादात राहिले. या दोघांवर ओबीसी आणि अपंग प्रवर्गाचा गैरफायदा घेऊन निवड मिळवल्याचा आरोप होता. पूजा खेडकर हिची दृष्टी कमी असल्याने दिव्यांग प्रवर्गातून निवड झाली होती. अभिषेक सिंग यांनी दिव्यांग वर्गातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांनी स्वत: ला लोकोमोटिव्ह डिसऑर्डर म्हणजेच चालण्यास असमर्थ असल्याचा दावा केला होता.









