ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत एकूण 749 उमेदवार यशस्वी झाले असून, यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या चार स्थानांवर मुली आहेत. श्रुती शर्मा ही देशात पहिली आली आहे. तर अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर तर ऐश्वर्या वर्मा चौथ्या क्रमांकावर आहे.
10 ऑक्टोबर 2021 ला UPSC CSE प्राथमिक परीक्षा झाली होती. 29 ऑक्टोबरला त्याचा निकाल जाहीर झाला. मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि त्याचा निकाल 17 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला. 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि 26 मे रोजी संपलेल्या परीक्षेची मुलाखत ही शेवटची फेरी होती. या शेवटच्या निकालानंतर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. UPSC च्या upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना निकाल पाहता येईल. उमेदवारांचे वैयक्तिक गुण निकालानंतर 15 दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत.
UPSC तर्फे देशातून 685 उमेदवारांना अपॉईंट करण्यात येणार आहे. यामध्ये खुल्या वर्गातील 244 उमेदवार, 73 उमेदवार हे EWS प्रवर्गातील आहेत. OBC प्रवर्गातील 203, SC प्रवर्गातील 105 तर ST प्रवर्गातील 60 उमेदवार असे एकूण 685 उमेदवार हे सिव्हिल सर्व्हिसेससाठी अपॉईंट करण्यात येणार आहेत. तर 64 उमेदवारांना रिझर्व्ह विभागात ठेवण्यात आलं आहे.