विधानसभा, विधानपरिषदेचे कामकाज एक दिवस तहकूब
प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजपने सत्ताधारी काँग्रेसची कोंडी करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीला होत असल्याच्या मुद्द्यावरुन भाजपने धरणे आंदोलन सुरु केले. त्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज पुढे ढकलण्यात आले. परंतु तीन वेळा अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सभागृहांचे कामकाज बुधवारी सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले.
मंगळवारी विधानसभेचे कामकाज सुरु होताच सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी प्रश्नोत्तर चर्चा हाती घेतली. त्यावेळी काँग्रेसचे आमदार शिवलिंगेगौडा यांनी विचारलेल्या प्रश्नावर गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर उत्तर देत होते. तेव्हा मध्येच उभे राहून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी गॅरंटी योजनांना विलंब होत असल्याबद्दल लक्षवेधी सूचनेंतर्गत याविषयीचा मुद्दा मांडण्यास परवानगी देण्याची विनंती भाजप आमदारांनी केली. मात्र, सभाध्यक्षांनी नकार दिला. त्यामुळे सरकारच्या या भूमिकेबद्दल भाजपच्या आमदारांनी विधानसभेत धरणे आंदोलन सुरु केले. सभाध्यक्षांविरोधात विरोधी पक्षाच्या आमदारांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे गदारोळ निर्माण झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसच्या पाच गॅरंटी योजना पाहून भाजप आमदारांचे स्वत: वरील नियंत्रण सुटले आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची आमची तयारी आहे. प्रश्नोत्तर चर्चेनंतर भाजप आमदारांनी तयार रहावे, असे सांगितले. आम्ही दिलेला शब्द पाळत आहे. त्यावेळी सिद्धरामय्या यांनी देखील भाजपने पाठविलेल्या नोटिसीतील सारांश वाचून दाखवून प्रश्नोत्तर आणि शून्य प्रहर वेळेनंतर मुद्दा मांडण्याची परवानगी मागितली होती. आताच परवानगीची मागणी केली तर कसेकाय देता येईल, प्रश्नोत्तर चर्चा संपल्यानंतर चर्चा करुया. तिखटपणे बोलने सोडून द्या, असा टोला लगाविला. यामुळे भाजप आमदार आणखी आक्रमक झाले. त्यांनी सिद्धरामय्या यांनी तिखटपणा हा शब्द मागे घ्यावा, अशी मागणी केली. सिद्धरामय्यांनी आपण वापरलेला शब्द असंसदीय नाही, असे स्पष्टीकरण दिले.
त्यानंतर सभाध्यक्षांनी प्रश्नोत्तर चर्चेनंतर मुद्दा मांडण्यास परवानगी देण्यात येईल, असे सांगितले. मात्र भाजपने प्रश्नोत्तर चर्चा रद्द करुन चर्चेला परवानगी द्यावी, अशी मागणी करत धरणे आंदोलन सुरु केले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील शाब्दिक चकमकी घडल्या. परिणामी सभागृहात कल्लोळ माजला.
विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर यांनी सभागृहाच्या नियमानुसारच कामकाज चालेल. मध्येच लक्षवेधी सूचना मांडण्याची मागणी करणे योग्य नव्हे. प्रश्नोत्तर चर्चेनंतर संधी देण्यात येईल. धरणे मागे घ्या, अशी विनंती विरोधी पक्ष भाजपकडे केली. मात्र भाजप आमदार भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे सभाध्यक्षांनी कामकाज 15 मिनिटे लांबणीवर टाकले.
पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच भाजप आमदारांनी धरणे आंदोलन सुरु केले. यावेळी सभाध्यक्ष खादर म्हणाले, प्रश्नोत्तर चर्चेआधिच लक्षवेधी सूचनेंतर्गत चर्चेला मुभा देणे वाईट परंपरेला कारणीभूत ठरेल. त्यामुळे अशा परंपरेचा पायंडा पडू देऊ नये. धरणे आंदोलन मागे घ्या, नंतर चर्चेला परवानगी दिली जाईल. उपप्रश्नावर चर्चा सुरु असतानाच चर्चेची मागणी करने योग्य नाही. तुमच्या अनुचित वर्तनाकडे जनतेचे लक्ष आहे. नियमानुसार सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी सहकार्य करा, अशी सभाध्यक्षांनी विनवणी करुन सुद्धा भाजप आमदारांनी माघार घेतली नाही. अशा परिस्थितीतच सभाध्यक्षांनी प्रश्नोत्तर चर्चा हाती घेतली. त्यानंतर शून्य प्रहर वेळेतील कामकाज हाती घेतले.
यावेळी निजद नेते कुमारस्वामी यांनी खोबऱ्यासाठी आधारभूत दर देण्यासंबंधी चर्चेसाठी अर्धातास वेळ द्यावा, अशी मागणी केली. तेव्हा सभाध्यक्षांनी पुढे चर्चेसाठी तुम्हाला वेळ दिला जाईल, असे सांगितले. त्यावेळी आताच वेळ द्यावी, अशी मागणी करत निजद आमदारांनी घोषणाबाजी केली. दुसरीकडे भाजप आमदारांचे धरणे आंदोलन सुरुच होते. यावेळी गदारोळ माजल्याने कामकाज दुपारपर्यंत पुढे ढकलण्यात आले.
भोजन विरामानंतर विधानसभेचे कामकाज सुरु होताच भाजप आमदारांनी पुन्हा धरणे सुरु केले. त्यावेळी सभाध्यक्षांनी राज्यपालांच्या भाषणावरील आभार प्रस्ताव मांडला. त्यावर काँग्रेसचे आमदार टी. बी. जयचंद्र यांनी चर्चा सुरु केली. त्यावेळी भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. परिणामी सभागृहात प्रचंड गदारोळ माजला. त्यामुळे सभाध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज बुधवारी 10.30 पर्यंत तहकूब केले.
विधानपरिषदेतही गोंधळ
सरकार विरुद्ध लक्षवेधी सूचना मांडण्यास परवानगी देण्याची मागणी करत भाजपच्या सदस्यांनी धरणे आंदोलन सुरु केले. भाजपचे आमदार माघार घेत नसल्याने विधानपरिषदेचे कामकाजही बुधवारी सकाळी 11 पर्यंत तहकूब करण्यात आले. सकाळी तीन वेळा कामकाज लांबणीवर टाकण्यात आल्यानंतर दुपारी भोजन विरामानंतर पुन्हा भाजप आमदार भूमिकेवर ठाम राहिले. सकाळी सभापतींच्या आसनावर आसनस्थ झालेले उपसभापती एम. के. प्राणेश यांनी रुलिंग दिले होते. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांनी हीच बाब उचलून धरण्यासाठी सभापती बसवराज होरट्टी यांच्यावर दबाव आणला. भाजपच्या सदस्यांना प्रश्नोत्तर चर्चेनंतर बोलण्याची संधी दिली जाईल, असे सांगितले. मात्र, काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याने कामकाज चालविणे अशक्य झाले. त्यामुळे सभापती होरट्टी यांनी कामकाज एक दिवस पुढे ढकलले.









