अधीक्षक अभियंत्या सभागृहातून निघून गेल्याने नगरसेवक आक्रमक
बेळगाव : शहरातील विविध विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, नगरविकास खात्यांच्या सचिवांसोबत मिटिंग असल्याचे महापौर व मनपा आयुक्तांना सांगून सभागृहातून बाहेर पडल्या. त्यामुळे या प्रकाराला सत्ताधारी गटासह विरोधी गटातील नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. शहरातील विकासावर चर्चा होत असताना अधीक्षक अभियंत्यांना का जाऊ देण्यात आले, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार, सभागृहाची शिस्त पाळली जात नाही, असा आरोप करत नगरसेवकांनी सभात्याग करण्याचा इशारा देत आपल्या आसनावरून उभे राहून महापौर व मनपा आयुक्तांना जाब विचारला. त्यामुळे मनपाच्या मुख्य सभागृहात काही वेळ गदारोळ निर्माण झाला.
मंगळवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी. यांच्यासह मनपा अधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या, नदीवरील लोखंडी पूल कोसळून मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना तसेच बेंगळूर येथील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर महापौरांनी बैठकीला सुरुवात केली. विविध विषयांवर चर्चा करण्यासह नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर अधिकारी उत्तर देत होते.
शहराच्या विकासाची जबाबदारी अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यावर आहे. मात्र नगरविकास खात्याच्या सचिवासोबत बैठक असल्याने सदर बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात असल्याचे सांगून निपाणीकर सभागृहातून बाहेर पडल्या. अचानक बैठक सुरू असतानाच निपाणीकर बाहेर पडल्याने शहराच्या विकासावर चर्चा होण्याआधीच त्यांना का जाऊ देण्यात आले. विचारलेल्या प्रश्नांना कोण उत्तर देणार, महापालिकेची सर्वसाधारणसभेची बैठक असल्याचे आठ दिवसांपूर्वी नोटिसीद्वारे कळविले आहे. मात्र नगरविकास खात्याच्या सचिवांसोबत अचानक बैठक असल्याचे सांगून अधिकारी निघून जात आहेत. त्यामुळे सभागृहाचे अस्तित्व आहे की नाही, अशा प्रकारची बैठक होण्याचे पहिल्यांदा पहावयास मिळत आहे. त्यामुळे निपाणीकर यांना याठिकाणी पुन्हा बोलवावे, अन्यथा बैठकीवर बहिष्कार टाकू असा इशारा देत सर्व नगरसेवक आसनावरून उठून उभे राहिले. यावेळी मनपा आयुक्तांसह महापौर व उपमहापौरांना नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे मनपा आयुक्त शुभा बी. यांनी तातडीने निपाणीकर यांना संपर्क साधून सभागृहात बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले. काही वेळातच निपाणीकर सभागृहात दाखल झाल्यानंतर सर्व नगरसेवक शांत झाले.









