गोंधळातच प्रस्तावाला मंजुरी : चर्चेनंतर होणार शिक्कामोर्तब
बेळगाव : शहरातील एलईडी बल्ब बसविण्याच्या टेंडरवरून महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार खडाजंगी झाली. 32 कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत सत्ताधारी गटाने ठराव मांडला. मात्र जोपर्यंत यावर संपूर्ण चर्चा होत नाही, तोपर्यंत त्याला मंजुरी देऊ नये, अशी जोरदार मागणी विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी, नगरसेवक अजिम पटवेगार, नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली. शहरातील विविध भागांमध्ये एलईडी बल्ब बसविण्यात येत आहेत. मागील कंत्राटदारालाच सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा वाढवून देणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर अंदाजे 32 कोटींची तरतूद करून त्यासाठी मंजुरी घेण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी प्रस्ताव सभागृहात मांडला. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीमध्ये याला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहामध्ये मंजुरी घेण्यासाठी सत्ताधारी गटाने प्रस्ताव मांडला.
विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आतापर्यंत झालेला खर्च, तसेच आता करण्यात आलेली तरतूद याबाबतची संपूर्ण माहिती सभागृहात द्यावी, त्यानंतरच हा ठराव मंजूर करावा, अशी मागणी केली. मात्र एलईडी बल्ब बसविणे, तसेच विद्युतपुरवठा खंडित ठेवण्यात आला तर त्याला विरोधी गटच जबाबदार असेल, अशी भूमिका सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी यांनी घेतली. तरीदेखील बराच उशीर वाद होऊन तो प्रस्ताव प्रलंबित ठेवण्याची जोरदार मागणी केली. याबाबत अधिकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत संपूर्ण माहिती दिली जाईल, मात्र या प्रस्तावाला मंजुरी दिली जावी, अशी मागणी केली. आम्हाला जर संपूर्ण माहिती देत असाल तर आम्ही निश्चितच मंजुरी देऊ. मात्र नेमका किती खर्च केला जात आहे, याचा लेखाजोखाच नाही. त्यामुळे आमचा विरोध असल्याचे सांगितले. नगरसेवक हणमंत कोंगाली यांनीही विरोधी गटाला याची माहिती दिली. मात्र विरोधी गटातील सर्वच नगरसेवकांनी चर्चेनंतर मंजुरी द्यावी, असे सांगितले. मात्र हा सध्या केवळ प्रस्ताव आहे. त्यानंतर संपूर्ण खर्च केला जाणार आहे. त्या खर्चाचा लेखाजोखा हवा असेल तर आम्ही देऊ. त्यामुळे गोंधळातच त्याला मंजुरी मिळाली आहे.









