जिल्हाधिकारी कार्यालयातील मलप्रभा सल्ला समितीच्या बैठकीतील प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मलप्रभा पाणी पुरवठा सल्ला समितीच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतून शेतकऱ्यांना बाहेर जाण्यासाठी सांगण्यात आल्याने बैठकीत एकच गदारोळ माजला. यामुळे जिल्हा प्रशासनाला नमते घेवून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणे भाग पडले.
मलप्रभा पाणी पुरवठा सल्ला समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनीही हजेरी लावली होती. यावेळी मंत्र्यांसह अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीला आले असताना उपस्थित शेतकऱ्यांना बैठकीतून बाहेर जाण्यासाठी सांगण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या या आदेशाला कडाडून विरोध दर्शविला. यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. शेतकऱ्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे बैठकीत गदारोळ माजला. शेतकऱ्यांनी परखड भूमिका घेतली.
ही बैठक सल्ला समितीच्या सदस्यांची बोलविण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितले. शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण घेणार नसेल तर बैठक बोलविलीच कशाला? असा प्रश्न उपस्थित करुन शेतकऱ्यांनी बैठकीतून बाहेर जाण्यास विरोध दर्शविला. आमच्या समस्या कोणासमोर मांडणार? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सांगितले. शेतकऱ्यांनी आपल्या भागात असणाऱ्या पाणी समस्या मांडल्या. पाण्याअभावी जनावरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेवून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली. अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणे भाग पडले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेवून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.









