मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आसनच नव्हे तर पक्षही धोक्मयात आहे. भाजपने एकनाथ शिंदे या वजिराच्या हातून राजाला शह दिला आहे. या खेळातील प्रतिमेची लढाई ठाकरे जिंकले. आता पक्ष, सत्ता वाचवण्यासाठी त्यांना बळ आणि कायदेशीर तरतुदीचा फायदा उठवता आला तरच निभाव लागणार आहे.
शिवसेना वर्धापन दिनाच्या 19 जूनच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचे भाषण एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य बंडखोरीला उद्देशून होते हे आता चार-पाच दिवसांनंतर स्पष्ट होऊ लागले आहे. निवडणुकीच्या आधी काँग्रेसला अतिरिक्त मते देऊ नयेत असा शिंदे यांचा आग्रह होता. यावरून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याशी त्यांचा वादही झाला.
संजय शिरसाट यांच्यासह नजीकच्या आमदारांना अयोध्येला जाण्यापासून रोखले, पण नाराजी-बंडखोरीची बिजे इथे होती असे मानता येत नाही. भाजप सोबत सत्ता वाटणीत ते उपमुख्यमंत्री होतील असे 2019 मध्ये म्हटले जायचे. पण, भाजपशी बिनसले. पक्ष भाजप गिळंकृत करेल या शंकेने ठाकरेंनी आधी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मागितले आणि बघता बघता स्थिती देवेंद्र फडणवीस यांच्या हाताबाहेर गेली. (जशी सध्या उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटत आहे.)
आता महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री शिंदेच व्हायचे. मात्र दोन्ही काँग्रेसच्या आग्रहाने उद्धव ठाकरे यांच्या गळय़ात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तेव्हापासून धुमसत असलेले बंड विधान परिषद निवडणुकीत फळाला आले! या भितीनेच विधानसभा अध्यक्ष निवड एकदा टाळली होती. पुढे राज्यपालांनीही टाळली.राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत करण्याचा आपला वाटा उचलून एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह महाराष्ट्र सोडून सहजपणे सुरतमध्ये दाखल झाले. पाच दिवसातील शिष्टाईचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या शिंदे यांच्याकडे आमदारांचे संख्याबळ वाढत चालले आहे आणि आपण कोणालाही रोखणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने त्यांच्यामागे 12 ते 17 आमदार राहतील अशी स्थिती आहे.
अर्थात याच दरम्यान त्यांनी जनतेला संबंधित केले आणि वर्षा निवासस्थान सोडून मातोश्री गाठले. हा प्रतिमेचा खेळ होता आणि तो यशस्वीरीत्या खेळून जनतेतील आपल्याबद्दलचे मत अधिक चांगले करून घेतले. मात्र आमदार अद्याप त्यांचे ऐकायला तयार नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून भाजप बरोबर सत्ता स्थापन करण्याचा त्यांचा आग्रह आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार आहे. उघडपणे त्यांना पद सोडा असे सांगणे बंडखोरांना शक्मय नाही. त्यामुळे हिंदुत्व आणि विविध मुद्दे ते पुढे करत आहेत. पण मूळ मुद्दा हा यातील बहुतांश लोकांच्या मागे लागलेल्या केंद्रीय तपास यंत्रणेचा आहे. यात जे सर्वाधिक आग्रही आहेत त्यांची सर्वात मोठी अडचण आहे.
मुख्यामंत्र्याना प्रताप सरनाईक यांनी उघडपणे पत्र पाठवून भाजपशी जुळवून घ्यायची विनंती केली होती. मात्र निर्णय होत नाही. हे पाहून काही प्रमुख मंडळींच्या फाइल्स यंत्रणेपर्यंत पोहोचवण्यात शिवसेनेतीलच त्रस्त मंडळींनी पुढाकार घेतला! त्यातून ज्यांच्या मागे ससेमिरा लागला ते सगळे बंडाला प्रवृत्त झाले! उद्धव ठाकरे यांच्या अपेक्षेबाहेर हे बंड आता पोहोचले आहे. संजय शिरसाठ यांचा व्हिडिओ आला आहे त्यामध्ये बदल्या आणि निधीचा उल्लेख असला तरी निधीची जबाबदारी ठाकरे यांनी सेनेत एकनाथ शिंदे यांच्याकडेच दिली होती! सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आमदार अनिल बाबर यांनी तक्रार केल्यानंतर खुद्द शिंदे यांनी त्यांचे प्रश्न आटपाडी येथे येऊन मार्गी लावले, एका ग्रामपंचायतीच्या निकालाबाबत मुख्यमंत्री थेट विभागीय आयुक्तांशी बोलले.मात्र तरीही सर्व आमदारांच्या सर्व मागण्या किंवा तक्रारी उद्धव ठाकरे यांनी त्याच तडफेने संपवल्या असत्या तर आजची स्थिती वेगळी असती. भेटीसाठी विनवण्याच्या तक्रारिंवर शुक्रवारी ठाकरे यांनी भूमिका मांडली.
आपल्या शरीराची एक बाजू दुखावली होती हे वास्तव त्यांनी मांडताना 56 वर्षापूर्वी स्थापनेवेळी पक्ष ज्या स्थितीत होता त्या स्थितीत आहे असे समजून जे आपल्या सोबत येऊ इच्छितात त्यांनी यावे. आपण कोणालाही अडवणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पण मुख्यमंत्रीपद धोक्मयात असताना प्रतिमेची लढाई जिंकणाऱया ठाकरे यांना शिवसेना हा राजकीय पक्ष आणि आपला विधिमंडळ पक्ष वाचवण्याची लढाई अर्ध्यावर सोडता येणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्रीपद अद्याप सोडले नाही हे सूचकपणे सांगितले आहे. पुढची सगळी लढाई ही न्यायालयात, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्याचे राज्यपाल यांच्या मैदानात खेळावी लागणार आहे.
शिंदे यांनी पक्ष आणि चिन्हावर ही दावा केला आहे. तर त्यांच्यासह सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले 37 आमदार अविश्वास ठरावावेळी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने राहू नयेत म्हणजे बंड शमेल, शिंदे कारवाईच्या टप्प्यात येतील या आशेवर ही लढाई सुरू आहे. तशी ती खूपच अवघड आहे, पण अशक्मय नाही.
शिवराज काटकर








