शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचा आदेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी मुलांची कमाल वयोमर्यादा वाढविण्याचा आदेश शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याने जारी केला आहे. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी किमान वय 6 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 8 वर्षे करण्यात आली आहे. हा नियम 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल, असे शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याने आदेशात म्हटले आहे.
इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्यांची नावनोंदणी करण्यासाठी ही कमाल वयोमर्यादा असून किमान वयोमर्यादा 6 वर्षे आहे. 8 वर्षांवरील मुलांना यापुढे पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिलीमधील मुलांना प्रवेशासाठी किमान वय 6 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने 6 वर्षांच्या वयोमर्यादेत हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने पुढील वर्षापासून हा नियम लागू होणे जवळपास निश्चित झाले आहे.
एलकेजी आणि यूकेजीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांची वयोमर्यादा यापूर्वीच किमान चार आणि पाच वर्षे निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच कमाल वयोमर्यादा सहा आणि सात वर्षे करण्यात आली आहे. सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार मुलांच्या नावनोंदणीसाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा वाढविल्यास शाळा सोडणाऱ्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे शालेय शिक्षण खात्याने आपल्या आदेशात म्हटले आहे.









