महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच राजकीय पक्षांमध्ये काही ना काही घडामोडी सुरू आहेत. केवळ एक घटना म्हणून त्याकडे पाहिले तर त्याचे महत्त्व लक्षात येणार नाही. मात्र जर त्या सगळ्या घटना जोडण्याचा प्रयत्न केला तर कसा गोंधळ माजलेला आहे आणि कशी सारवासारव सुरू आहे हे सहज लक्षात येईल. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरून कामगार नेते, आमदार भाई जगताप यांची उचलबांगडी करून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली आहे. मुंबई अध्यक्षपदी पुन्हा एकदा मराठी देण्याचे भान मात्र यावेळी काँग्रेसने राखले आहे. राज्याच्या नेतृत्वात म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी दुसरा नेता निवडला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. विदर्भातीलच नेते विजय वडेट्टीवार दिल्लीत हाय कमांडला भेटूनही आले होते. मात्र तसा निर्णय अद्याप झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी एकाचवेळी दोघांची निवड करताना शरद पवार यांनी पक्षाची भूमिका पुरोगामीच असली पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या गटासाठी सुप्रिया सुळे यांना तर भाजपाबरोबर हात मिळवणी केली पाहिजे असे म्हणणाऱ्या अजित पवार, प्रफुल पटेल यांच्या गटासाठी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करून पुढच्या राजकारणाची दिशा ठरवून टाकली आहे. इतर पदाधिकारी काळजीपूर्वक निवडतानाच महाराष्ट्र सुप्रिया सुळे यांच्याकडे राहील याचीही काळजी पवार यांनी घेतली आहे. महाराष्ट्रातील पक्षांच्या प्रदेशाध्यक्षपदी यापूर्वी महिला अनेकदा विराजमान झाल्या आहेत. मात्र राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांची निवड महाराष्ट्राच्या दृष्टीने विशेषत: महिला वर्गाच्या दृष्टीनेही मोठी घडामोड आहे. फुटीच्या उंबरठ्यावर राष्ट्रवादी आहे असे सांगितले जात असताना पवारांनी ही खेळी करून प्रत्येकाला आपापल्या वाटा मोकळ्या करून ठेवल्या आहेत. सुळे यांच्या निवडीनंतर अजितदादा नाराज आहेत अशी हवा उठली आणि दिल्लीतून विमानाने निघालेल्या दादांना महाराष्ट्रात उतरताच खुलासा करावा लागला. मी कधीच पक्षाच्या पदावर नव्हतो, माझा रस पक्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात आहे आणि माझ्याकडे विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी आधीपासूनच आहे हे दादांनी पुन्हा एकदा जाहीर केले. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे महाराष्ट्रात दौरे सुरू झाले आहेत. प्रत्येक मतदार संघात ते वातावरण निर्मिती करत फिरत आहेत. कर्नाटकात निम्म्यापेक्षा जास्त खासदारांना तिकीट दिले जाणार नाही अशी हवा उठल्याने अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आरोप करणे तर काहींनी निवडणूक न लढवण्याची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात मात्र विद्यमान खासदारांना फारसे दुखावले गेलेले नाही. उलट शिंदे गटाच्या मतदार संघावर ठिकठिकाणी भाजप पदाधिकारी दावा सांगू लागले आहेत. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. एकत्रित शिवसेनेत तशी खदखद प्रथम बोलून दाखवलेल्या गजानन कीर्तिकर यांनीच शिंदे गटाच्या बाजूने अलीकडेच भाजपवर तोफ डागली. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभेला सहकार्य न करण्याची भूमिका डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. भाजप पदाधिकाऱ्यांवर पक्षाचाच गृहमंत्री असताना विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो म्हणून ही टीका करण्यात आली होती. त्याला भाजपचे आमदार आणि मंत्र्यांनी पाठबळ देऊ केले. भाजपने कल्याण, ठाणे आणि पालघर या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला असून ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेची मुंबई महापालिकेप्रमाणे चौकशी करा अशी यापूर्वी मागणी केली आहे. त्यातच तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा त्याशिवाय विस्तार होणार नाही असे भाजप श्रेष्ठींनी दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार हवा आहे. मात्र अब्दुल सत्तार यांच्या कृषी खात्यामार्फत गुन्हे दाखल असणाऱ्या खाजगी व्यक्तींना घेऊन अकोल्यातील खते, बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांना लाखो रुपयाची मागणी करण्यात आल्याचा आरोप झाला आहे. हा छापा मंत्र्यांच्या वतीने टाकला असे खाजगी वृत्तवाहिन्यांच्या समोर छापा टाकणाऱ्या व्यक्तीने सांगून कृषीमंत्र्यांच्या अडचणी वाढवल्या. मात्र सत्तार यांनी त्याचे समर्थन करत प्रत्येकाला अशा तक्रारी येतील तेथे छापा टाकण्याचा अधिकार हवा असे मत मांडले आहे. मात्र या प्रकरणाने सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात भाजपच्या आमदारांना तक्रारीची संधी मिळाली आहे. या सर्व प्रकरणांनी नाराज मुख्यमंत्र्यांनी कामकाज थांबवून काश्मीर गाठले असे म्हटले गेले. त्याच काळात श्रीकांत शिंदे यांनी आपण खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याची भूमिका घेतली. सध्याची एकूण परिस्थिती पाहता हे पेल्यातील वादळ ठरण्याची आणि पेल्यातच संपण्याची शक्यता अधिक आहे. मात्र त्यामुळे सगळे वातावरण ढवळून निघाले आहे हे निश्चित.