आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न
वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सहकारी कंपनी जियो फायनान्शिअल सर्हिसेस लिमिटेड यांचा आयपीओ लवकरच बाजारात सादर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिओ फायनान्शिअलने आयपीओ सादरीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळवण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. परंतु रिलायन्स इंडस्ट्रीजने या संदर्भात आत्तापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मात्र दिलेली नाही. याच दरम्यान मंगळवारी 2 मे रोजी समभागधारक व क्रेडिटर्स यांची एक बैठक होणार असून यामध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडबाबत चर्चा होणार असल्याचे सांगितले जाते.

नव्या सीईआंना पदभार
मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये के. व्ही. कामत यांची जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या बिगर कार्यकारी चेअरमनपदी नियुक्ती केली होती. माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार हितेश सेठिया यांना पुढील काही महिन्यांमध्ये सीईओ पद बहाल केले जाणार असल्याचे समजते. सीईओ म्हणून जबाबदारी ते लवकरच स्वीकारतील, असे सांगितले जाते.
व्यवसायात होणार फायदा
मागच्याच वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी जियो फायनान्शिअल सर्व्हिसेसला स्वतंत्र एक वेगळे स्वतंत्र अस्तित्व बहाल करणार असल्याचे म्हटले होते. तंत्रज्ञान आधारित व्यवसायाअंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रिजच्या देशभर असलेल्या उपलब्धतेचा फायदा कंपनी घेत वित्त उत्पादनांना डिजिटल माध्यमातून सादर करणार असल्याचे समजते. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रिज आपल्या सर्व समभागधारकांना जियो फायनान्शियल सर्व्हिसेसचा बाजारात लिस्टींग झाल्यानंतर एक समभाग देणार आहे.









