10 ते 12 महिन्यात आयपीओ : 2 हजार कोटी उभारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पनीर आणि आईक्रीम सोबत डेअरी उत्पादने बनवणारी मिल्की मिस्ट डेअरी फूडस् प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी रक्कम उभारणीची तयारी करते आहे. कंपनी पुढील दहा ते बारा महिन्यांमध्ये आपला आयपीओ बाजारात आणणार आहे.
सदरच्या आयपीओच्या माध्यमातून पंधराशे ते 2 हजार कोटी रुपये कंपनी उभारणार आहे. सध्याला बाजारामध्ये हटसन अॅग्रो प्रॉडक्ट, हेरिटेज फूड्स, पराग मिल्क फूड्स आणि डोडला डेअरी या कंपन्या सूचीबद्ध आहेत. यांच्या पावलावर पाऊल ठेवतच मिल्की मिस्ट कंपनीची वाटचाल असणार आहे. डेअरी उत्पादन क्षेत्रामध्ये नेस्ले, ब्रिटानिया आणि सूचीबद्ध नसलेली अमूल अशा कंपन्या स्पर्धेमध्ये आहेत. आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेली रक्कम येणाऱ्या काळात विविध शहरांमध्ये उत्पादनांचा विस्तार करण्यासोबतच नव्या उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी कंपनी खर्च करणार आहे. कंपनी येणाऱ्या दहा ते बारा महिन्यांमध्ये आयपीओ सादर करणार आहे. उत्पादनांच्या विस्तारासाठी कंपनी प्रयत्नशील असणार असून दक्षिण भारताव्यतिरिक्त इतर भागातही विस्तारची योजना आहे.
कंपनीची स्थापना
मिल्की मिस्टचे संस्थापक टी सतीश कुमार यांनी या कंपनीची स्थापना 1994 मध्ये केली होती. त्यावेळी ते निव्वळ 17 वर्षाचे होते. पनीर, दही, लोणी, चीज योगर्ट आणि आईक्रीम यासारखी उत्पादने कंपनी तयार करते.









