कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस पडणार
पुढील दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार असून, कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यंदा ‘असनी’ चक्रीवादाळामुळे ६ दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहे.
दरवर्षीपेक्षा यंदा पाऊस लवकरच येणार आहे. यवतमाळ, महागाव उमरखेड आणि नांदेडमध्ये आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. उन्हाच्या काहीलेने नागरीक त्रस्त झाले होते. त्यातच आज पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामानाचे वेळापत्रक
यंदा २ जूनला मान्सून कोकणात दाखल होणार आहे. तर ६ जूनला तो मुंबईत पोहचेल. ११ जूनला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सांगली,सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. विदर्भात प्रामुख्याने अमरावती आणि अकोल्यात २१ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट
येत्या चार दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. तर पुढील दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर पाऊस हजेरी लावणार आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीसह राज्यातील ९ राज्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आङे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.