वृत्तसंस्था / पुणे
2024 च्या 11 व्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत भवानी रजपूतच्या शानदार कामगिरीच्या जोरावर युपी योद्धाज संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना जयपूर पिंक पॅन्थर्सचा 46-18 अशा गुणांनी दणदणीत पराभव केला.
या स्पर्धेतील एलीमिनेटर-1 च्या या सामन्यात युपी योद्धाज संघाचा खेळ आक्रमक आणि दर्जेदार झाल्यानंतर जयपूर पिंक पॅन्थर्सकडून फारसा प्रतिकार होऊ शकला नाही. भवानी रजपूतने 12 गुण तर हितेशने 5 गुण नोंदविले. आता या स्पर्धेत युपी योद्धाज आणि हरियाणा स्टिलर्स यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यात जयपूर पिंक पॅन्थर्सच्या खेळाडूंना स्थिर होण्यास अधिक विलंब लागला. दरम्यान, भवानी रजपूत आणि भरत यांच्या आक्रमक चढायांमुळे युपी योद्धाजला झटपट गुण मिळाले. सातव्या मिनिटातच युपी योद्धाजने जयपूर पिंक पॅन्थर्सचे सर्व गडी बाद केले. यावेळी युपी योद्धाज संघ 6 गुणांनी आघाडीवर होता. पहिल्या 10 मिनिटातच युपी योद्धाजने जयपूर संघावर 9 गुणांची आघाडी घेतली. हितेश, सुमीत आणि महेंद्रसिंग यांनी युपी योद्धाजची बचावफळी भक्कम राखली होती. मध्यंतरावेळी युपी योद्धाजने जयपूर पिंक पॅन्थर्सवर 23-8 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तराधार्थ भवानी रजपूतने सुपर 10 गुण नोंदविले. सामन्यातील पहिल्या अर्धातास अखेर जयपूर पिंक पॅन्थर्स 26 गुणांनी पिछाडीवर होता. युपी योद्धाजने या सामन्यात तिसऱ्यांदा जयपूर पिंक पॅन्थर्सचे सर्व गडी बाद केले. त्यामुळे हा सामना अखेरीस युपी योद्धाजने एकतर्फी जिंकला









