वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडीतील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेतील मंगळवारी युपी योद्धास आणि बंगाल वॉरियर्स यांच्यातील चुरसीचा सामना अखेर 41-41 असा बरोबरीत (टाय) राहिला.
या सामन्यात मध्यंतरापर्यंत युपी योद्धास संघाने बंगाल वॉरियर्सवर 25-15 अशा 10 गुणांची आघाडी घेतली होती पण त्यानंतर उत्तरार्धातील खेळामाध्ये शेवटच्या पाच मिनिटात बंगाल वॉरियर्सने दजेंदार खेळ करत युपी योद्धासला विजयापासून रोखले. कर्णधार मनिंदर सिंग सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना आपल्या संघाला विजय मिळवून देईल असे वाटत होते पण युपी योद्धासच्या कबड्डीपटूंनी मनिंदर सिंगची ही चढाई रोखल्याने हा सामना अखेर बरोबरीत राहिला. युपी योद्धास संघातील प्रदीप नरवालचा खेळ दर्जेदार झाला. त्याने चौथ्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सचे पहिल्यांदा सर्व गडी बाद करण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजवली. त्यानंतर 13 व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सचे दुसऱयांदा सर्व गडी बाद झाल्याने युपी योद्धासने 20-7 अशी भक्कम आघाडी मिळवली होती. 24 व्या मिनिटाला युपी योद्धासचे सर्व गडी बाद झाल्याने गुणांचे अंतर कमी झाले. मनिंदर सिंग आणि मनोज गौडा तसेच प्रदीप नरवाल यांचा खेळ या सामन्यात अधिक उठावदार झाला.









