सामनावीर ग्रेस हॅरिसचे नाबाद अर्धशतक : इक्लेस्टोनचे तीन बळी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारी येथे झालेल्या आठव्या सामन्यात ग्रेस हॅरिसच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर युपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सचा 26 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यांनी पराभव केला. सामनावीर हॅरिसने 33 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 60 धावा फटकाविल्या.
या सामन्यात युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सला प्रथम फलंदाजी दिली. गुजरात जायंट्सने 20 षटकात 5 बाद 142 धावा जमवित युपी वॉरियर्सला विजयासाठी 143 धावांचे सोपे आव्हान दिले. त्यानंतर युपी वॉरियर्सने 15.4 षटकात 4 बाद 143 धावा जमवित हा सामना जिंकला.
गुजरात जायंट्सच्या डावामध्ये सलामीच्या वुलव्हार्टने 26 चेंडूत 4 चौकारांसह 28, कर्णधार बेथ मुनीने 16 चेंडूत 2 चौकारांसह 16, हरलीन देओलने 24 चेंडूत 1 चौकारासह 18, लिचफिल्डने 26 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 35, गार्डनरने 17 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 30 धावा जमविल्या. हेमलताने नाबाद 2 तर ब्राईसने नाबाद 5 धावा केल्या. गुजरात जायंट्सच्या डावामध्ये 2 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. वुलव्हार्ट आणि कर्णधार मुनी यांनी सलामीच्या गड्यासाठी 32 चेंडूत 40 धावांची भागिदारी केली तर गार्डनर आणि लिचफिल्ड यांनी चौथ्या गड्यासाठी 52 धावांची भर घातली. गुजरात जायंट्सला अवांतराच्या रुपात 8 धावा मिळाल्या. युपी वॉरियर्सतर्फे इक्लेस्टोनने 20 धावात 3 तर राजेश्वरी गायकवाडने 33 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युपी वॉरियर्सच्या डावाला कर्णधार हिली आणि किरण नवगिरे यांनी बऱ्यापैकी सुरूवात करुन देताना 27 चेंडूत 42 धावांची भागिदारी केली. कंवरने नवगिरेला झेलबाद केले. तिने 8 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. कर्णधार हिली ब्राईसच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. तिने 21 चेंडूत 7 चौकारांसह 33 धावा जमविल्या. चमारी अटापटू आणि हॅरिस यांनी तिसऱ्या गड्यासाठी 36 धावांची भार घातली. अटापटूने 11 चेंडूत 4 चौकारांसह 17 धावा जमविल्या. सेहरावत केवळ 2 धावावर बाद झाली. हॅरिस आणि दीप्ती शर्मा यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. दीप्ती शर्माने 14 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 17 धावा जमविल्या. युपी वॉरियर्सच्या डावात 2 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. या स्पर्धेत ग्रेस हॅरिसने आतापर्यंतच्या सामन्यात सर्वाधिक धावा जमविल्याने ती या सामनाअखेर ऑरेंज कॅपची मानकरी ठरली. गुजरात जायंट्सतर्फे तनुजा कंवरने 2 तर मेघना सिंग व ब्राईस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – गुजरात जायंट्स 20 षटकात 5 बाद 142 (वुलव्हार्ट 28, मुनी 16, देओल 18, लिचफिल्ड 35, गार्डनर 30, हेमलता नाबाद 2, ब्राईस नाबाद 5, अवांतर 8, इक्लेस्टोन 3-20, गायकवाड 1-33), युपी वॉरियर्स 15.4 षटकात 4 बाद 143 (अॅलिसा हिली 33, नवगिरे 12, अटापटू 17, ग्रेस हॅरिस नाबाद 60, सेहरावत 2, दीप्ती शर्मा नाबाद 17, अवांतर 2, तनुजा कंवर 2-23, मेघना सिंग 1-39, ब्राईस 1-19).









