हॉकी इंडिया लीग : 3-1 गोलफरकाने मात, रसेलचे दोन गोल
वृत्तसंस्था/ राऊरकेला, ओडिशा
जेम्स माझारेलोने सामना जिंकून देणाऱ्या केलेल्या कामगिरीच्या जोरावर हॉकी इंडिया लीग 2024-25 मधील सामन्यात यूपी रुद्राजने वेदांत कलिंगा लान्सर्सचा 3-1 असा पराभव केला.
एन्रिक गोन्झालेझने 13 व्या मिनिटाला गोल करून कलिंगा लान्सर्सने आघाडी घेतल्यानंतर यूपी रुद्राजने जोरदार मुसंडी मारली आणि केन रसेलने (45 व 60 वे मिनिट) दोन व 50 व्या मिनिटाला सुदीप चिरमाकोने गोल नोंदवत त्यांना 3-1 अशी आघाडी मिळवून दिली आणि ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत विजय साकार केला. यूपी रुद्राजने पहिल्या सत्राची जोरात सुरुवात केली. कर्णधार हार्दिक सिंगने मध्यक्षेत्रातून चाली रचण्यास सुरुवात केली. अनेकदा सर्कलच्या आतपर्यंत मुसंडी मारली तरी आघाडीवीरांना लान्सर्सचा गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकला ते भेदू शकले नाहीत.
13 व्या मिनिटाला लान्सर्सला पहिले यश मिळाले, पण हे त्यांचे एकमेव यश ठरले. उजव्घ्या बगलेतून आगेकूच करीत संजयने बॉबी सिंग धामीला चेंडू पुरविला, त्याने तो गोन्झालेझकडे सोपविला. गोन्झालेझने त्यावर अचूक गोल नोंदवून लान्सर्सला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी वाढवण्याची संधी त्यांना मिळाली होती. पण माझारेलोच्या भक्कम गोलरक्षणामुळे अलेक्झांडर हेन्ड्रिक्स, परताप लाक्रा व थिएरी ब्रिंकमन यांना गोल नोंदवता आले नाहीत.
दुसऱ्या सत्रातही लान्सर्सने वर्चस्व गाजवले. रुद्राजच्या सर्कलमध्ये त्यांनी वारंवार घुसखोरी केली. पण माझारेलोच्या अप्रतिम गोलरक्षणामुळे त्यांना यश मिळविता आले नाही. दरम्यान, रुद्राजला संधी निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला तो लान्सर्सच्या भक्कम बचावामुळे. त्यात रोशन कुजुरची प्रमुख भूमिका होती. मध्यंतरापर्यंत लान्सर्सने 13 वेळा रुद्राजच्या तर रुद्राजने सहा वेळा सर्कलमध्ये घुसखोरी केली. पूर्वार्धात रुद्राजच्या माझारेलोने तब्बल पाच गोल वाचवल्याने गोलफलक 1-0 असा मर्यादित राहिला होता.
तिसऱ्या सत्रात 33 व्या मिनिटाला माझारेलोने बॉबी सिंग धामीचा गोलही फोल ठरविला. यानंतर रुद्राजने हळूहळू जोर पकडला आणि आक्रमणास सुरुवात केली. आकाशदीप सिंग व मनमीत सिंग यांनी गोलरक्षक पाठकची वारंवार परीक्षा घेतली. पण पाठकनेही अप्रतिम गोलरक्षण केले. पण 44 व्या मिनिटाला रुद्राजला पहिले यश मिळाले. केन रसेलने पहिल्या पेनल्टी कॉर्नवर जोरदार ड्रॅग फ्लिक करीत गोल नोंदवूत रुद्राजला बरोबरी साधून दिली. या गोलमुळे जोम वाढल्यानंतर रुद्राजने शेवटच्या सत्रात आणखी आक्रमण तेज केले. 46 व्या मिनिटाला चिरमाकोने पेनल्टी कॉर्नरवर जोरदार फटका मारला. पण पाठकने तो अचूक अडविला.
50 व्या मिनिटाला लार्स बॉकच्या जोरदार ड्राईव्हला चिरमाकोने गोलची दिशा देत रुद्राजला आघाडी मिळवून दिली. लान्सर्सनेही बरोबरीसाठी जोरदार धडपड केली. 54 व्या मिनिटाला ब्रिंकमनचा प्रयत्न माझारेलोने फोल ठरविला.. सामना संपण्यास तीन मिनिटे असताना रुद्राजने खुल्या गोलचा लाभ उठविला. ललितकुमार उपाध्यायने 14 सेकंद असताना पेनल्टी कॉर्नर मिळविला आणि केन रसेलने त्यावर अचूक गोल नोंदवत रुद्राजच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याचा हा सामन्यातील दुसरा गोल होता. गोलरक्षक जेम्स माझारेलोला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.









