मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 300 मान्यवरांची उपस्थिती
अयोध्या / वृत्तसंस्था
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य राममंदिराच्या गर्भगृहाच्या निर्मितीची पायाभरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य 300 मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. गोरक्ष पीठाच्या महंतांच्या हस्ते या कार्याला प्रारंभ करण्यात आला. रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित अशा 100 हून अधिक जणांचाही या कार्यक्रमात सहभाग होता, अशी माहिती देण्यात आली.
योगी आदित्यनाथ सकाळी 9 वाजता राममंदीर परिसरात पोहचले. त्यांचे स्वागत उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केले. राम कथा उद्यानात सर्व मान्यवर एकत्र जमले होते. त्यानंतर 9.30 वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हनुमानगढी येथे हनुमंताचे दर्शन घेतले. नंतर सर्व मान्यवरांनी रामजन्मभूमीकडे प्रयाण केले. तेथे गर्भगृहाची कोनशीला स्थापन करण्यात आली आणि पायाभरणीचा कार्यक्रमही करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळणे हे परमभाग्य असल्याची प्रतिक्रिया केशवप्रसाद मौर्य आणि मान्यवरांनी व्यक्त केली.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रामजन्मभूमीवरील भव्य राममंदिराच्या निर्मितीला प्रारंभ करण्यात आला आहे. आज बुधवारी दुसऱया टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. सर्व रामभक्तांसाठी हा दिन आनंदाचा आणि भाग्याचा आहे. रामजन्मभूमीसाठी ज्या रामभक्तांनी जीवाची तमा न बाळगता आंदोलन केले त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत. मी स्वतः या मंदिराच्या निर्मितीचा साक्षीदार आहे. मीही राममंदीर आंदोलनाचा एक सैनिक आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे भावोत्कट उद्गार मौर्य यांनी काढले.
सहस्र वर्षे टिकणार मंदीर
आगामी किमान एक सहस्र वर्षे एक चिराही सैल होऊ नये अशा प्रकारे भव्य राममंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे, असे राममंदिर न्यायाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यानुसार मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. आता दुसऱया आणि महत्वाच्या टप्प्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे.
25 हजार यात्रेकरुंसाठी सुविधा
रामजन्मभूमी परिसरात एकाच वेळी 25 हजार यात्रेकरु सामावू शकतील अशा प्रकारे सुविधांचे निर्माण कार्य करण्यात येणार आहे. मंदिराकडे जाण्याच्या महामार्गावर दोन्ही बाजूंना यात्रेकरु निवास निर्माण करण्यात येणार आहेत, या निवासांमध्ये यात्रेकरुंसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कसे असणार गर्भगृह
राजस्थानच्या मकराना येथील पांढरा संगमरवर या मंदिराच्या गर्भगृहाच्या निर्मितीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. कोरीव संगमरवरी स्तंभ आणि घनाकारही आता अयोध्येत आणण्यात येत आहेत. एकंदर आठ एकर भूमीत हे सर्व संकुल निर्माण करण्यात येणार असून प्रांगणाच्या क्षेत्राभोवतील परिक्रमा मार्ग निर्माण करण्यात येणार आहे. गर्भगृहाच्या तळभागात राममंदिराला आधार देण्यासाठी 9 लाख घनफूट परिमाणाचे सहस्रावधी दगड उपयोगात आणण्यात येणार आहेत. तर प्रत्यक्ष मंदिरासाठी 4.70 लाख घनफूट गुलाबी वाळूचा कोरीव खडक उपयोगात आणण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
भगवान वाल्मिकी, माता शबरीचीही मंदिरे
रामजन्मभूमीस्थानी भगवान रामचंद्रांच्या भव्य मंदिरासह रामयणाशी संबंधित अन्य महान व्यक्तींचीही मंदिरे निर्माण करण्यात येणार आहेत. यात ज्यांनी रामायण ग्रंथाची निर्मिती केली, ते भगवान वाल्मिकी, प्रभू रामचंद्रांना नौकेतून नदी पार करुन देणारे केवट, माता शबरी आणि रावणाने सीतामाईंचे अपहरण पेले असताना त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करताना प्राणार्पण केलेले जटायू यांचीही मंदिरे या परिसरात निर्माण करण्यात येणार आहेत.
द्वितीय टप्प्याचा प्रारंभ
ड गर्भगृहाच्या पायाभरणीने राममंदिराच्या द्वितीय टप्प्याला प्रारंभ
ड रामायणाशी संबंधित महनीय व्यक्तींची मंदिरे परिसरात होणार
ड गर्भगृहासाठी राजस्थानातील मकराना येथील संगमरवर आणणार









