मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे अनावरण
न्हावेली / वार्ताहर
मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे अनावरण करण्यात आले. हा ध्वजस्तंभ मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृप अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला.सकाळी १० वाजता समाजसेवक तसेच भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊळ यांच्या घरी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी उपस्थित होते. त्यानंतर सव्वा अकरा वाजता त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले. आगमनावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली व परिसर जल्लोषमय झाला.यावेळी भिडे गुरुजींच्या हस्ते ध्वजस्तंभाचे अनावरण करण्यात आले.मोठ्या संख्येने मळगाव पंचक्रोशीतील हिंदू बांधव उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. अनावरणानंतर परिसरात “छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय”अशा घोषणा देण्यात आल्या आणि वातावरण दुमदुमून गेले.भिडे गुरुजींनी आपल्या भाषणातून छत्रपतींच्या कार्याचा गौरव केला तसेच मार्गदर्शन करताना सांगितले की, “मळगाव प्रमाणे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ प्रत्येक गावात उभारावा आणि हिंदूंनी एकत्र यावे.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रामस्थ, महिला व युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला भव्यतेची परिपूर्णता लाभली. ध्वजस्तंभामुळे चौकाचे वैभव वाढले असून ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.









