जनरल रावत नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : राजनाथ सिंह
वृत्तसंस्था/ देहरादून
देहरादूनच्या टन ब्रिज स्कूलमध्ये देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीसी) जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अनावरण केले आहे. जनरल रावत हे एक वीरयोद्ध होते, जे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहतील. देशासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा अर्थ काय असतो हे जनरल रावत यांनी दाखवून दिले होते असे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.
8 डिसेंबर 2021 रोजी सीडीएस जनरर राव यांना हेलिकॉप्टर दुर्घटनेत हौतात्म्य प्राप्त झाले होते. या दुर्घटनेवेळी त्यांच्या पत्नी मधुलिका रावत तसेच 12 अन्य जवान हुतात्मा झाले होते. जनरल रावत हे अखेरच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करत होते असे राजनाथ यांनी म्हटले आहे.
टन ब्रिज स्कूलमध्ये रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर होम करण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील यात सामील झाले. जम्मू-काश्मीर सीमेवर जनरल रावत यांना गोळी लागली होती, तेव्हा त्यांचे शौर्य पाहून त्यांना एलओसीच्या सुरक्षेची धुरा सोपविण्यात आली हीत. यानंतर त्यांना देशाचे पहिले सीडीएस म्हणून नियुक्त करण्यात आले होते. जनरल रावत यांनी सैन्याची परंपरा कायम ठेवत देशाची सेवा करत राहिले आणि त्यांनी हौतात्म्य पत्करल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये 8 डिसेंबर रोजी जनरल रावत यांचे एमआय-17 व्ही5 हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासमवेत 13 जण हुतात्मा झाले होते. तर ग्रूप कॅप्टन वरुण सिंह हे गंभीर जखमी झाले होते.
जनरल रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील चौहान राजपूत परिवारात झाला होता. त्यांचे वडिल लक्ष्मण सिंह रावत हे सैन्यातील लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले होते. रावत यांनी देहरादूनच्या कँबरीन हॉल स्कूल, शिमल्यातील सेंट एडवर्ड स्कूल आणि भारतीय सैन्य अकॅडमी देहरादून येथून शिक्षण घेतले होते. रावत यांनी 11 व्या गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमधून 1978 मध्ये सैन्य कारकीर्दीची सुरुवात केली होती. 31 डिसेंबर 2016 रोजी ते सैन्यप्रमुख झाले होते. तर 2019 मध्ये जनरल रावत यांना देशाचे पहिले सीडीएस म्हणून नियुक्त करण्यात आले होते.









