मुख्यमंत्री, क्रीडामंत्री, पी.टी. उषा, मेरी कोमची उपस्थिती
पणजी, मडगाव : आमचे गोवा राज्य हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोजकांचे आवडते ठिकाण होत आहे. गोव्यात कित्येक इव्हेंटांचे आयोजन सफल झाले आहे. आता गोव्यात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे. ते सुद्धा आम्ही सफल आयोजनाने यशस्वी करून दाखवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या शुभंकर अनावरण सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर क्रीडामंत्री गोविंद गावडे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बॉक्सर मेरी कोम, क्रीडा सचिव स्वेतिका सच्चन, पर्यटनमंत्री रोहन खंवटे तसेच मंत्री, आमदार उपस्थित होते. ज्या ‘मोगा’ची आपण आतुरतेने वाट पाहात होते, तो आता गोमंतकीयाना मिळाला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर म्हणून गवारेड्याची निवड करण्यात आली आहे. त्याला ‘मोगा’ असे नाव देण्यात आले असून यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर मोगाचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण गोव्यात ‘मोगा’विषयी जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली होती. ‘मोगा’ या नावाने शुंभरकरची घोषणा करण्यात आल्यानंतर या उत्सुकतेला अखेर विराम मिळाला. आता या ‘मोगा’मुळेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे वातावरण तयार होणार आहे. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन सफलतेने होण्यासाठी खूप मेहनत घेतली असून ते सर्व कामावर व्यक्तिशा लक्ष ठेऊन आहेत. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी क्रीडामंत्री गावडेंची प्रशंसा केली. मागील कित्येक वर्षांपासून गोव्यात राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी ही प्रतिष्ठतेची स्पर्धा गोव्यात होत आहे. त्यासाठी शासन सज्ज असल्याचे यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
गवारेडा हा शक्ती, निर्धाराचे प्रतीक : क्रीडामंत्री
शुभंकर हा कुठल्याही स्पर्धेची उर्जा आणि आत्मा असतो. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गवारेडा हा आम्ही शुभंकर म्हणून निवडला आहे. गवारेडा हा शक्ती, निर्धाराचे स्वरूप आहे. लवकरच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा मूड संपूर्ण राज्यात फोफावणार असल्याचे यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले.
देश क्रीडा क्षेत्रातही अव्वल होईल : पी. टी. उषा
देशातील क्रीडा क्षेत्र आता विकसित झाले आहे. या क्षेत्रात आता कित्येक संधी उपलब्ध झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील आपला देश क्रीडा क्षेत्रातही सुपर पॉवर होणार, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा म्हणाल्या.
स्पर्धेचा एक भाग असल्याने आनंद : मेरी कोम
गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा एक भाग असल्याने ती एक अभिमानास्पद बाब असल्याचे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटू मेरी कोम म्हणाल्या. या स्पर्धेत एकूण 43 खेळांचा समावेश आहे तसेच 5000 हून जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा यशस्वी होईल यात तीळमात्र शंका नाही. सन, सँड अँड स्पोर्ट्स अशी गोव्याची आता नवीन ओळख झाली आहे, असे मेरी कोम म्हणाल्या.









