प्रतिनिधी /साखळी
कारापूर तिस्क नजिक असलेल्या पडोशे गृहनिर्माण वसाहतीचे श्रीराम नगर असे नामकरण करणाऱया नामफलकाचे अनावरण गांधी जयंतीच्या निमित्ताने करण्यात आले. पडोशे गावाच्या बाजूने असलेल्या नामफलकाचे अनावरण पर्ये पंचायतीचे स्थानिक पंच लक्ष्मीकांत शिरोडकर यांनी केले. तर कारापूर तिस्क येथील नामफलकाचे उद्घाटन कारापूरचे सरपंच दत्ताराम खारकांडे यांनी केले. यावेळी पडोशे गृहनिर्माण वसाहतीतील रहिवाशी उपस्थित होते.
गांधी जयंतीनिमित्त नामनिर्देशक फलकाचे उद्घाटन आणि तद्नंतर कारापूर तिस्क नजिक असलेल्या पडोशे गृहनिर्माण वसाहतीत स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. सुरुवातीला पडोशे गावाच्या बाजूने श्रीराम नगर नामकरण आणि नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पर्ये पंचायतीचे स्थानिक पंचायत सदस्य लक्ष्मीकांत शिरोडकर यांनी नामनिर्देशक फलकाच्या ठिकाणी नारळ वाढवून उद्घाटन केले. यावेळी बोलताना श्री. शिरोडकर यांनी गांधीजयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱया स्वच्छता मोहिमेची माहिती दिली व त्याचे महत्व स्पष्ट केले.
यानंतर कारापूर तिस्क येथे श्रीरामनगर नामफलकाचे अनावरण कारापूरचे सरपंच दत्ताराम खारकांडे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच खारकांडे यांनी कारापूर तिस्क परिसर स्वच्छ ठेवण्याची ग्वाही देत, पडोश गृहनिर्माण वसाहतीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना उपसरपंच सौ. तन्वी सावंत यांनी
श्रीरामनगर गृहनिर्माण वसाहतीतील रहिवाशांनी एकजुटीने राहून परिसराचा कायापालट करण्याचे आवाहन केले. जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत यांनी कारापूर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कार्यात सहकार्य करण्याच्या हेतूने उत्तर गोवा जिल्हा पंचायतीमार्फत निरीक्षण करणारे कॅमेरे बसविण्याचे आश्वसन दिले.
या कार्यक्रमाला उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, कारापूर पंचायतीच्या उपसरपंच सौ. तन्वी सावंत व पंचायत सदस्य ज्ञानेश्वर बाले, सौ. अवनी सावंत, दामोदर गुरव, उज्वला कवळेकर, दिव्या नाईक व योगेश पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी श्रीरामनगर वसाहतीचे निमंत्रक अत्माराम देसाई यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. अर्जून परब यांनी आभार व्यक्त केले.









