क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची माहिती
पणजी : राज्यात येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण येत्या 14 मे रोजी करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली. बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 37 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये 37 क्रीडा प्रकारांचा समावेश असल्याने गोव्याने सर्व प्रकारांमधून भाग घ्यावा, असे आवाहन मंत्री गावडे यांनी केले. राष्ट्रीय खेळांसाठी 14 मे रोजी लोगो लाँच केला जाईल. ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या स्पर्धा सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. गोव्यासाठी राष्ट्रीय खेळांचे महत्त्व आणि स्थानिक क्रीडापटूंना आपल्या कौशल्याद्वारे राज्याचा गौरव करण्याची ही अनोखी संधी आहे. त्यासाठी राज्याने भरघोस निधीची तरतूद करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या स्पर्धांमध्ये केवळ राज्य क्रीडा संघटनाच नव्हे तर तालुका आणि ग्रामपातळीवरील क्लबनाही सहभागी करून घेण्याची इच्छा मंत्री गावडे यांनी व्यक्त केली. तसे झाल्यासच क्रीडा विषयांना कानाकोप्रयात प्रोत्साहन देता येईल व त्याद्वारे या स्पर्धा गोमंतकीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनण्यासारखे वातावरण तयार होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. सदर प्रस्तावित राष्ट्रीय स्पर्धांच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकारने आतापर्यंत सुमारे 450 कोटी ऊपये खर्च केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.









