6.5 मीटर उंचीचा कांस्य पुतळा ः 9,500 किलो वजन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नवीन संसद भवनावरील अशोकस्तंभाच्या कांस्य पुतळय़ाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी केले. हा पुतळा 6.5 मीटर उंच आणि 9 हजार 500 किलो वजनाचा आहे. या प्रतिमेला आधार देण्यासाठी सुमारे 6,500 किलो वजनाची स्टीलची यंत्रणाही तयार करण्यात आली आहे. या प्रतिमेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी नव्या संसदेच्या कामात गुंतलेल्या कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. याप्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी हेदेखील पंतप्रधानांसोबत उपस्थित होते.
सेंट्रल व्हिस्टा हा मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याचा सेंट्रल ऍव्हेन्यू 80 टक्के तयार आहे. यापूर्वी त्याच्या बांधकामासाठी सुमारे 971 कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र आता हा खर्च 29 टक्क्मयांनी वाढून 1,250 कोटींहून अधिक होऊ शकतो. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 2022 निश्चित केली आहे. हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे. त्यात संसद भवनासह केंद्र सरकारशी संबंधित सर्व कार्यालयांचा समावेश आहे. सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचे काम 18 जुलैपर्यंत पूर्ण होईल, असे हरदीपसिंग पुरी यांनी अलीकडेच सांगितले होते.
देशाचे राष्ट्रीय चिन्ह
अशोकस्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. मौर्य वंशाचा तिसरा शासक सम्राट अशोक हा प्राचीन काळातील भारतीय उपखंडातील सर्वात शक्तिशाली राजांपैकी एक होता. त्याने आपल्या कारकिर्दीत देशाच्या विविध भागात अनेक स्तूप आणि स्तंभ बांधले. सारनाथस्थित अशोकस्तंभाचा स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकार करण्यात आला होता.









