लोणावळा : मावळ तालुक्यातील सोमाटणे टोलनाका हा अधिकृत की अनधिकृत याचा निर्णय होईपर्यंत मावळवासियांकडून टोल वसुली केली जाणार नाही, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोमटणे फाटा येथील टोल नाका हा अनधिकृत असल्याचे सर्व पुरावे शासनाला देण्यात आले असून, हा बेकायदेशीर टोलनाका कायमचा बंद करा या मागणीसाठी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने मागील चार दिवसापासून तळेगाव येथील मंदिरात आमरण उपोषण सुरू होते. जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे व कृती समिती सदस्य असे सात जण उपोषणाला बसले होते. या उपोषणाला मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय पाठिंबा देण्यात आला आहे. मावळ वासियांसाठी अतिशय त्रासदायक ठरणारा सोमाटणे टोलनाका कायमचा बंद करा या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आज माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व भाजपाचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमाटणे टोल नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये किशोर आवारे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष पदाधिकारी व मावळ तालुक्यातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाची दखल घेत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलन स्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
सोमाटणे टोलनाक्याविषयी सर्व माहिती जाणून घेतली. हा टोल नाका अधिकृत आहे की अनधिकृत याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने 26 तारखेनंतर पहिल्याच आठवडय़ात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सोमाटणे टोलनाका हटाव कृती समिती यांची संयुक्त बैठक लावत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत मावळ तालुक्यातील नागरिकांकडून टोल घेतला जाऊ नये, अशा सूचना मंत्री चव्हाण यांनी आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आयआरबी कंपनीचे अधिकारी जयवंत डांगरे यांनी देखील चव्हाण यांच्या सूचनांचे पालन करत मावळ वासियांकडून निर्णय होईपर्यंत टोल वसुली केली जाणार नाही असे जाहीर केले.








