कुलूप कापता न आल्याने चोरट्यांचे पलायन
प्रतिनिधी /बेळगाव
दत्त कॉलनी, नेहरूनगर, मच्छे येथे बुधवारी दुपारी घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात सलग तीन दिवस तीन घरफोड्या घडूनही पोलीस यंत्रणेला अद्याप जाग आली नाही. त्यामुळे घरफोड्या वाढल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका लष्करी जवानाच्या घरी पाच लाखांची चोरी झाली होती. दत्त
कॉलनी, नेहरूनगर, मच्छे येथील एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट फोडण्यात आला होता. चोरट्यांनी 5 लाखाचा ऐवज पळविला होता. या इमारतीजवळच बुधवारी चोरीचा प्रयत्न झाला आहे.
मनोज तानाजी पाटील यांच्या घराला लावलेले कुलूप कापण्याचा प्रयत्न झाला आहे. बुधवारी मनोज व त्यांचे कुटुंबीय खानापूर तालुक्यातील कुसमळीला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी हे कृत्य केले आहे. त्यांना कुलूप व्यवस्थित कापता आले नाही. त्यामुळे अर्धवट सोडून चोरट्यांनी तेथून पलायन केले आहे.









