गटारी-कालवे फुटून पाणी शिरले शिवारात : रस्त्यांची दुर्दशा
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक,कंग्राळी खुर्द किर्यात परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मंगळवारी दुपारी अडीच वाजता अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. ग्राम पंचायतीने नाले व कालवे दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गटारी व कालवे फुटून शिवारामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती दिसून आली. परंतु संपूर्ण पाणी गावच्या पश्चिम दिशेकडून वाहत असल्यामुळे रस्त्यांची व शिवारातील बांधांची त्रेधातिरपीट उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
ढगफुटीसदृश्य पाऊस
सोमवारी सदर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाच. परंतु मंगळवारी दुपारी अडीच वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत जणू ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाण्याचे लोंढे वाहू लागले. आणि बघता बघता गावच्या पश्चिमेकडील शिवारामध्ये सदर पाणी शिरुन पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली. परंतु याला ग्राम पंचायत जबाबदार, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त करण्यात येत होत्या.
ग्राम पंचायतकडून गटारींची पाहणी नाहीच
पावसाळयापूर्वी संपूर्ण गावातील गटारी व मोठे कालवे पाणी निचरा होण्यासाठी योग्य आहेत की गाळाने किंवा गवताने भरले आहेत, हे पाहणे गरजेचे असते. परंतु मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पीडीओंनी गावात फेरफटका मारुन गटारीची, कालव्यांची पाहणी केलीच नाही. त्यामुळे गाळाने भरलेल्या गटारीतून व कालव्यांतून पाणी ओसंडून वाहून शेतीचे व रस्त्याचे नुकसान झाले आहे. त्याला पीडीओच जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया ग्राम पंचायत सदस्यांकडून व्यक्त करण्यात आल्या.
कंग्राळी बुद्रुक गावात कोणी वाली आहे का?
कंग्राळी बुद्रुक गावच्या दक्षिणेकडून शाहूनगर, महापालिकेच्या वसाहतीचे पाणी पूर्वेकडून वैभवनगरकडे सोडतात. परंतु कालव्यांची दुरुस्ती कोण करणार? पूर्व व दक्षिणेकडून येणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर रोजचे सांडपाणी कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत हद्दीमध्ये येत आहे.









