मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी : विविध ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम,हवेत गारठा वाढला
बेळगाव : वळीव पावसाने वाऱ्यासह शहर व ग्रामीण भागाला झोडपून काढले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरणात निर्माण झालेला उष्मा काही प्रमाणात कमी झाला असून हवेत गारठा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शेतकरीदेखील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागले आहेत. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला आहे. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या होत्या. पंधरा दिवसांपूर्वीदेखील वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यावेळी सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने सलामी दिल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले व गटारींच्या सफाईकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले. परिणामी बाजारपेठेसह कांदा मार्केटमध्ये गुडघाभर पाणी तुंबल्याने पावसाच्या पाण्यातच थांबून भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करावा लागला होता.
त्यामुळे नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी कांदा मार्केटमधील गटारींची महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता करण्यास सांगितले. रविवारीदेखील दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दुपारच्या दरम्यान पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही. तेव्हापासून उष्म्यात प्रचंड वाढ झाली होती. मात्र पावसाने हजेरी लावली नाही. मान्सूनला लवकरच सुरुवात होणार असल्याने शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे बांधावर शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. बी-बियाणे, सेंद्रीय खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तसेच खरिप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खताचा तुटवडा भासू नये, यासाठी कृषी खात्याकडून पुरेसा साठा करण्यात आला आहे. मंगळवारी 4.15 च्या दरम्यान शहरासह ग्रामीण भागात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्याचबरोबर वातावरणात निर्माण झालेला उष्मादेखील काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.
न्यायालयानजीक कोसळले झाड
मंगळवारी वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने हजेरी लावल्याने आरटीओ सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यावर मराठा मंडळ नजीक वाळलेले झाड रस्त्याच्या मधोमध कोसळून पडले. केवळ सुदैवानेच यात कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. त्यामुळे काही रिक्षाचालक व नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या व बुंधा हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला.









