जोंधळा-भाजीपाला पिकांचे नुकसान : वीट व्यावसायिक अडचणीत
वार्ताहर/किणये
तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. शिवारातील जोंधळा व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच अवकाळी पावसामुळे वीट व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गेल्या काही दिवसापासून हवामानात कमालीचा बदल झालेला आहे. उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. उन्हाच्या तीव्र चटक्यामुळे सारे जण हैराण झाले होते. मंगळवारी दुपारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची रिमझिम झाली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना मात्र घरी जाताना भिजतच जावे लागले. तालुक्याच्या काही भागांमध्ये रब्बी हंगामातील मसूर, वाटाणा आदी पिकांची मळणी सुरू आहे. मच्छे, पिरनवाडी, देसूर, झाडशहापूर, हलगा, बस्तवाड, कोंडसकोप, तारिहाळ, नंदीहळळी, किणये, नावगे, बेळगुंदी, राकसकोप, बिजगर्णी, बेनकनहळळी आदी भागात जोंधळा पीक घेण्यात आलेले आहे.
या जोंधळ्याची कणसे बहरून आलेली आहेत. ती तोडणीसाठी आलेले आहेत. मात्र मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जोंधळा पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. मंगळवारी हा पाऊस तालुक्याच्या काही भागांमध्ये रिमझिम झाला. तसेच पश्चिम भागातही पाऊस झाला. तर उद्यमबाग, मच्छे, पिरनवाडी या परिसरात अधिक प्रमाणात पाऊस झाला. देसूर, नंदीहळळी या भागात वीटभट्ट्या अधिक प्रमाणात आहेत. या परिसरातील नागरिक या वीट व्यवसायावर अवलंबून आहेत. देसूर भागातील वीट प्रसिद्ध आहे. सध्या वीटभट्टी लावण्याचे काम जोमाने सुरू आहे. मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कच्च्या विटांवरती ताडपत्री झाकण्यासाठी वीटभट्टीवरील कामगारांची एकच धावपळ उडाली होती.









