शेती मशागतीची कामे कशी करायची, या चिंतेमध्ये शेतकरी : उसाला पोषक पाऊस
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक किर्यात परिसरामध्ये अवकाळी मुसळधार पावसाने दररोज धुमाकूळ सुरूच ठेवला असून असाच पाऊस होत राहिल्यास शेती मशागतीची कामे कशी करायची, या चिंतेमध्ये शेतकरी वर्ग असल्याचे दिसून येत आहे. रोजच्या अवकाळी पावसामुळे शिवारामध्ये भर पावसाळ्यामध्ये जसे पाणी ओसंडून वाहते तशी परिस्थिती वरूणराजाने केलेली दिसून येत आहे. यामुळे कधी एकदा पाऊस थांबतो रे बाबा म्हणण्याची वेळ शेतकरी वर्गावर आल्याचे चित्र दिसून येत आहे.
कडबा-भाजीपाला पिकाचे नुकसान
दररोज पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे पावसाळ्यामध्ये सुका चारा म्हणून जनावरांना घालण्यासाठी शेतामध्ये वाळवून कडबा तयार केलेल्या पेंड्या, रोजच्या पावसामुळे शेतात पाणी भरल्यामुळे कुजून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये कोथिंबीर, शेपू, लालभाजी, मेथी ही भाजीपाल्याची पिके कुजून गेल्यामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे पुढे भाजीपाला महाग होणार असल्याचेही चित्र दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसून येत आहे.
रवणी व मृग नक्षत्राला कशी भात पेरणी करायची?
शेतकरी वर्ग 27 तारखेला सुरू होणाऱ्या रवणी नक्षत्राला धूळवाफेमध्ये पेरणी करत असतो. त्यानंतर मृग नक्षत्राने उघडीप दिल्यास त्याही नक्षत्रामध्ये धूळवाफ भात पेरणी करत असतो. परंतु यावर्षी गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शिवारामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे पेरणी कशी करणार, या विवंचनेमध्ये शेतकरी वर्ग असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ऊस पिकाला वरदान
यावर्षी कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड भागामध्ये ऊस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे ऊस पिकाला भरपूर पाणी मिळाल्यामुळे परिसरातील ऊसपिके जोमात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सदर अवकाळी पाऊस इतर पिकांना वगळता ऊस पिकाला मात्र वरदान ठरल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.









