कराड, सातारा :
सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारनंतर कराडसह परिसराला अवकाळी पावसाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले. सलग दोन्ही दिवस वीजपुरवठा खंडीत झाल्याने उकाड्याने अस्वस्थ झालेले नागरिक हैराण झाले. तसेच सातारा शहरासह खटाव, जावली, खंडाळा तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळीने पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांची पळापळ झाली. ज्वारी काढणीची कामे युद्धपातळीवर सुरू असताना शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील स्वराज कॉलनीच्या प्रवेशद्वारावरच भले मोठे झाड पडले. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद झाला. या परिसरात वर्दळ असल्याने अनेक नागरिक अडकून पडले. कराड पंचायत समिती परिसरात रस्त्याकडेच्या हॉटेलवर झाड पडल्याने हॉटेलचे नुकसान झाले. शहरात अन्य काही ठिकाणीही झाडे पडल्याच्या घटना घडल्या.
कराड, मलकापूर, सैदापूर, वारूंजीसह आसपासच्या गावात अवकाळी पावसाला मंगळवारी सायंकाळी सुरूवात झाली. मोठ्या आवाजातील विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाल्याने हायवेवरील वाहतूक ठप्प झाली. दुचाकी वाहनधारक ठिकठिकाणी अडकून पडले. पावसासह वारे वेगाने वाहू लागल्याने कराडसह परिसरात इमारतींवरील होर्डिंग्जचा मोठ्या प्रमाणात आवाज होऊन इमारतीला हादरे बसल्यासारखे जाणवत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या. पावसाचे पाणी नेहमीप्रमाणे दत्त चौक, बसस्थानक परिसर, पोपटभाई पेट्रोलपंप चौक, विजय दिवस चौकात अनेक ठिकाणी साचले. सुमारे दोन अडीच तास विजांचा कडकडाट सुरू असल्याने दुचाकीस्वार पाऊस कमी होण्याची वाट पहात ताटकळत उभे होते. त्यामुळे शहरातील रस्ते ओस पडले. हायवेवर नव्या उड्डाणपुलाखाली दुचाकीस्वारांची मोठी गर्दी झाली होती.
- वीजपुरवठा खंडीत अन् अस्वस्थता वाढली
मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटाने वीजपुरवठा खंडीत झाला. कराड, मलकापूरसह परिसरात विजपुरवठा खंडीत झाला. ढगाळ वातावरणाने दिवसभर अस्वस्थ झालेले नागरिक, लहान मुले हे वीजपुरवठा खंडीत झाल्यावर पुरते हैराण झाले. वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत झालेला नव्हता.
- साताऱ्यात वादळी वाऱ्याने सातारकर हैराण, विजेचा खेळखंडोबा मागणी
सातारा जिह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये कराड, पाटण भागात वाऱ्यासह पाऊस पडत आहे. तोच पाऊस सातारा शहरात पडेल अशी चिन्हे 1 एप्रिल रोजी होती. परंतु नुसता वादळी वाऱ्याने नुसताच धुरळा उडाला. पावसाचे काही प्रमाणात शिंतोडे पडले. परंतु या वातावरणामुळे वीज मंडळाचा वीजेचा खेळखंडोबा दुपारपासून सुरू होता. यामुळे रात्री उकाडा वाढल्याने सातारकरांची अक्षरश: घालमेल झाली. फॅन, एसीसीची हवाही कमी पडू लागली. काही जण रस्त्यावर येवून रात्री उशिरापर्यंत बसले होते.








