जिल्ह्याच्या काही भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने गुरुवार पासून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दाखवून प्रशासनाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले होते. जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह गडगडाट तर काही ठिकाणी सुसाट्याचा वाऱ्यांसह पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे कळत आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोतोली येथे पिकांचे नुकसान
पाच वाजता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वारणा कापशी, शिवारे, माणगाव ,भेडसगांव ,कोतोली परिसरात पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसासह वारा मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे काही ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले. पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मका, सुर्यफुल याचबरोबर काही ठिकाणच्या केळीच्या बागेचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.

दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात गारांचा पाऊस
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या दाजीपूर अभयारण्यातील शिवाचीवाडी येथे सायंकाळी 5 वाजता मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

मलकापूर परिसरात पिकांना फटका
जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर परिसरात अवकाळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. विजांचा गडगटासह पावसाने सुरवात झाली. त्यातच शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांबरोबर मिरची व्यापाऱ्यांची चांगलीच कसरत झाली. अचानक सुरू झालेल्या पावसाने परिसरातील कलिंगड, मिरची, मका, सूर्यफूल या पिकाला चांगला फटका बसला आहे.
राधानगरीत पावसाने नागरिकांची तारांबळ
हवामान खात्याने वर्तविण्यात आलेल्या अंदाजा नुसार कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला होता त्यानुसार राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात दुपारी तीन वाजलेपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी 4 च्या सुमारास अवकाळी पाऊसाला सुरवात झाली. राधानगरी शहरात व तालुक्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसास सुरवात झाली. अचानकपणे आलेल्या या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी पावसाने चांगलेच झोडपून काढले.








