शहरामध्ये पावसाचा शिडकावा तर ग्रामीण भागात पावसाच्या दमदार सरी
प्रतिनिधी/ बेळगाव
थंडीमध्ये वाढ झाली असतानाच पुन्हा हवामानामध्ये बदल झाला असून बुधवारी शहरासह ग्रामीण भागात अवेळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. कडधान्य पिकांना मोठा फटका या पावसाचा बसला आहे. अचानकपणे आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
यावर्षी उशिराने थंडीला सुरुवात झाली. मध्यंतरी काही दिवस बऱ्यापैकी थंडी पडली. त्यामुळे पाऊस लवकर होणार नाही, अशी शक्यता होती. मात्र मंगळवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. शहराच्या काही भागामध्ये पावसाचा शिडकावा झाला तर ग्रामीण भागामध्ये दमदार पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे कडधान्य, भाजीपाला, टरबूज, काकडी या पिकांचे नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. दमदार पाऊस पडेल या भीतीने बैठे व्यापारी, फेरीवाले यांनी तातडीने प्लास्टिकचा आधार घेऊन पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. काहीवेळ पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर शहरामध्ये पावसाने उसंत घेतली. मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण कायम होते.
ग्रामीण भागात दमदार पाऊस
ग्रामीण भागामध्ये दमदार पाऊस कोसळला. येळ्ळूर, मच्छे, पिरनवाडी या गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. यामुळे कडधान्य पिकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी कलिंगड, टरबूज, काकडी, दोडकी यासह इतर पिकेही घातली आहेत. त्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. येळ्ळूरमध्ये दमदार पाऊस पडला. या पावसामुळे सर्वत्र पाणी झाले होते. या पावसामुळे हवेमध्ये काहीसा गारवा निर्माण झाला होता.
मच्छे-पिरनवाडी परिसर
मच्छे : मच्छे व पिरनवाडी भागातही बुधवारी पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पावसाचा शिडकावा झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली व हवेतील गारव्यामध्ये वाढ झाली आहे. अलीकडे वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने पावसाळा, उन्हाळा व हिवाळा याचा अनुभव दर महिन्याला येत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.









