जत :
मागच्या दोन ते तीन वर्षानंतर जत तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असतानाच सोमवारी सायंकाळी तिकोंडी परिसरात झालेल्या अवकाळी व गारपीटीमुळे अनेक शेतकयांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे कांही शेतकऱ्यांच्या बागा उन्मळून पडल्या. रॅकवरील बेदाण्यालाही याचा फटका बसला आहे. सुमारे दोन कोटींहून अधिकचे नुकसान या अवकाळीने केले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होते आहे.
जत तालुक्याचा पूर्व भाग गेल्या कांही दिवसापासून द्राक्ष, बेदाणा उत्पादनासाठी आघाडी घेत आहे. शेकडो एकरावर या भागात द्राक्षाची लागवड आहे. शिवाय तासगाव, पंढरपूरच्या तोडीचा बेदाणाही येथे तयार होत आहे. यंदा वातावरण चांगले असल्याने या भागात द्राक्षाचे पीक जोमात होते. अनेकांच्या बागा गेल्या आहेत, तर उशिरा छाटणीच्या बागांना अजून कांही दिवसांचा अवधी आहे. परंतु सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या बादळी वाऱ्यासह पावसाने तिकोंडी परिसरातील शेतकऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे.
सोमवारी सायंकाळी साडे सहा ते साडे सात यावेळेत तिकोंडी, मिवर्गी, पांडोझरी, कोणबगी, संख, धुळकरवाडी, कॉत्येव बोबलाद आदी भागात गारपीट व वादळी वारे झाले. यात या भागातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतक्रयांना फटका बसला आहे. कांहीच्या बागा मुळासकट उन्मळून पडल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तर वाऱ्याने बागेतील घडांची गळती झाली. गारांमुळे चांगल्या फळांना दणका बसला आहे.
तिकोंडी येथील सिध्दाण्णा गोब्बी पाच एकर, भैराप्पा अमृततटटी चार एकर, संतोष गोब्बी दोन एकर, शिवानंद गोब्बी दोन एकर, आप्पासो व्हनकंडे, उमेश व्हनकंडे यांची पाच एकर, सोमू गोब्बी दोन एकर, भरमू गोब्बी एक एकर पांडोझरी येथील पुजारी यांची दोन एकर यासह या भागातील रॅकवरील बेदाण्यालाही पावसाचा फटका बसला आहे. तिकोंडी परिसरात सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
- तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी
तालुक्यातील उमराणी, जत शहर, मुचंडी, सिध्दनाथ, येळवी, सनमडी, बनाळी, शेगाव, बिरनाळ, बिळूर, खोजनवाडी, मेंढीगिरी, उमदीचा कांही भाग, माडग्याळ, अंकलगी दरिबडची, दरिकोणूर या भागातही वादळी ग्रयासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. तर द्राक्ष पीकांसह हरभरा, ज्वारी, मका या पीकांचे नुकसान झाले आहे.
- तातडीने पंचनामे करा : सुभाष गोब्बी
माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गोब्बी व जि.प.चे माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे म्हणाले, तिकोंडीसह तालुक्यातील अनेक गावात द्राक्षांसह इतर पीकांना अवकाळीचा फटका बसला आहे. महसुल प्रशासनाने तातडीने पंचानामे करून नुकसान भरपाई दिली पाहीजे. पीकविम्यातूनही आंम्हाला रक्कम मिळावी. दुष्काळातही आम्ही विकतचे पाणी आणून बागा जगवल्या. परंतु सोमवारच्या अवकाळीने चांगलेच नुकसान केले आहे.








