अनेकांची तारांबळ : पावसामुळे थंडी गायब
प्रतिनिधी/ बेळगाव
अवकाळी पावसाने पुन्हा शहरामध्ये गुरुवारी सायंकाळी हजेरी लावली. या पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले आणि बैठ्या व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. काहीवेळच पाऊस झाला तरी या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचून होते.
गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होताना दिसत आहे. सकाळी आकाश स्वच्छ असले तरी दुपारनंतर उष्म्यामध्ये वाढ होऊन पाऊस पडत आहे. गुरुवारी शहराच्या पूर्वभागामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला. तर शहरामध्येही हा पाऊस झाला आहे. तसेच होनगा, काकती, कंग्राळी बुद्रुक परिसरालाही पावसाने झोडपले. पावसामुळे शेतकऱ्यांना थोडी खुशी, थोडा गम झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
सध्या काही ठिकाणी भातकापणी अंतिम टप्प्यात आहे तर काही भागामध्ये भाताच्या मळण्या सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे कडधान्य पेरणी खोळंबली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना कडधान्य पेरणी करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी येळ्ळूर तसेच इतर परिसरात पाऊस झाला होता. त्यानंतर गुरुवारी पूर्वभागात बऱ्यापैकी पाऊस कोसळला आहे. अवकाळी पावसामुळे साऱ्यांचीच फजिती झाली होती. पावसानंतर पुन्हा उष्मा वाढला होता. सायंकाळी अचानक पाऊस आल्यामुळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना आडोसा शोधावा लागला. तर काहीजणांना भिजतच घर गाठावे लागले.
गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठा बदल झाला आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. मात्र ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. आता डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. तरीदेखील म्हणावी तशी थंडी पडली नाही. त्यामुळे यावर्षी थंडीचा ऋतूच गायब होणार का? असा प्रश्न पडला आहे. पहाटेच्यावेळी काहीप्रमाणात थंडी असली तरी दिवसभर मात्र उष्मा जाणवत आहे. सायंकाळी पाऊस पडत आहे. एकूणच संमिश्र वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.









