प्रतिनिधी/ सातारा
गेले तीन दिवस हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार येणार, येणार म्हणत अखेर शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अवकाळी पावसाचे आगमन झाले. मेघगर्जनेसह जोराच्या सोसाटय़ाच्या वाऱयाबरोबर पावसाने गेले तीन दिवस उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना थंडगार वातावरणाने सुखावून सोडले. सातारा शहरासह जावली, महाबळेश्वर, फलटण, कराड तालुक्यातही वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.
शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत असल्यामुळे सातारा शहर परिसरातील नागरिकांना वाढत्या तापमानाने नकोसे केले होते. दुपारी तीन नंतर आकाशात काळ्s ढग दाटून चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला. आणि थंडगार वाऱयामुळे नागरिक सुखावले. अनेकांनी घराच्या अंगणामध्ये, टेरेसवर पावसात भिजण्याचा आनंद लुटला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. शहरातील मुख्य रस्ते निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी धावत पळत या पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधला. भाजी, साहित्य विक्रेत्यांची पळापळ झाली. जोराचा वारा, आकाशात विजाचा कडकडत होत असल्याने काही वेळासाठी वीज पुरवठाही खंडित झाला होता.
मागील तीन दिवसापूर्वी जिह्यातील पाचवड, आनेवाडी, महाबळेश्वर, वाई या परिसरात पावसाने धमाका उडवला होता. शेतात काढणीला आलेला भुईमूग उन्हाळी ज्वारी, गहू पिके तसेच आंब्याच्या भागातील लगडलेल्या कैऱयांवर या पावसाचा मोठा परिणाम होऊन जोराच्या वाऱयामुळे अनेक आंबा उत्पादकांना यांचा फटका बसला.
वाऱयामुळे शेकडो कैऱया झाडाखाली पडल्याचा नजारा पाहून याचा परिणाम हंगामातील आंबा उत्पादनावर होणार आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकरी नाराज झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे वाढत्या किमतीच्या फळभाज्या आणि पालेभाज्यांवरही या पावसाचा परिणाम होऊन पुढील आठवडय़ापासून भाज्यांच्याही दर या पावसामुळे निश्चितच वाढतील असा अंदाज भाजी विक्रेते व्यक्त करताना दिसत आहेत जोरदार झालेल्या या पावसामुळे सातारा शहरातील राधिका रोड, राजवाडा परिसर, पालिका कार्यालय चौकात तळ्याचे स्वरूप येऊन पाण्याची डबकी साचल्याचे चित्र दिसून येत होते.
बळीराजाची धांदल
रब्बीच्या ज्वारी, गहू काढणी व कापणी अंतिम टप्प्यात आली असताना जिल्हय़ात अवकाळी सुरू झाल्यामुळे बळीराजाची चांगलीच धांदल उडाली आहे. एकतर मजूर मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या शेतकऱयांनी घरच्या घरीच ज्वारी काढणी सुरूवात केली आहे. ज्वारी काढून पडलेली असतानाच पावसामुळे ही ज्वारी काळी पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच कडब्याचेही नुकसान होऊ शकते.








