श्रीनगर येथील घटना : स्थानिक रहिवाशांमध्ये संताप, गतिरोधक त्वरित हटविण्याची मागणी

बेळगाव : अशास्त्राrय गतिरोधकाने एका तरुणाचा बळी घेतला आहे. रविवारी पहाटे श्रीनगरजवळ गतिरोधकावरून उडून रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या कँटरला दुचाकीची धडक बसून एक तरुण जागीच ठार झाला आहे. शनिवारी सायंकाळी घालण्यात आलेल्या गतिरोधकाने तरुणाचा बळी घेतला आहे. प्रतीक फकिराप्पा होंगल (वय 23) रा. महांतेशनगर असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून श्रीनगरजवळील एका खासगी शाळेनजीक घातलेल्या अशास्त्राrय गतिरोधकामुळे ही घटना घडली असून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शनिवारी सायंकाळीच हा गतिरोधक घालण्यात आला असून केवळ काही तासांच्या अंतरावर तरुणाचा बळी गेला आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रविवारी पहाटे 5 ते 6 या वेळेत हा अपघात घडला आहे. प्रतीक आपल्या मोटारसायकलवरून जात होता. त्याला भला मोठा गतिरोधक दिसला नाही. मोटारसायकलसह उडून तो जवळच रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या कँटरवर आदळला. सुरुवातीला काही वेळ या घटनेची माहिती मिळाली नाही. प्रतीक रस्त्यावर पडून विव्हळत होता. पहाटे मंदिराला निघालेले एस. एस. हिरेमठ यांनी अपघातात गंभीर जखमी होऊन विव्हळत पडलेल्या तरुणाला पाहिले. मंदिराला जात असल्यामुळे त्यांनी आपल्या सोबत मोबाईल घेतला नव्हता. मदतीलाही कोणीच पुढे आले नाही. त्याचवेळी प्रतीकच्या आईचा त्याच्या मोबाईलवर कॉल आला. आईला माहिती देऊन रुग्णवाहिका मागविण्यात आली. गेल्या वर्षी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या प्रतीकचा भाऊ पुणे येथील एका खासगी कंपनीत काम करतो. बेळगावात आई ललिता व प्रतीक दोघे रहात होते. मुलाचे अपघाती निधन झाल्यामुळे आईने एकच आक्रोश केला. अशास्त्राrय गतिरोधकाने तरुणाचा बळी घेतल्याच्या प्रकाराने स्थानिक नागरिकही संतप्त झाले असून असे गतिरोधक त्वरित हटविण्याची मागणी केली जात आहे. महांतेशनगर परिसरातील अनेक ठिकाणी असे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक एन. सी. काडदेवर पुढील तपास करीत आहेत.









