ग्रा. पं. चे दुर्लक्ष : ग्रामस्थांच्या आरोग्याच्या तक्रारी, दुर्गंधीचा सामना, स्वच्छतेची गरज
बेळगाव : बेकिनकेरे येथील गटारी आणि रस्त्यावरील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष झाल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ग्रा. पं. कडे तक्रार करून देखील दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्याचबरोबर गावच्या सौंदर्याला बाधा येऊ लागली आहे. गावातील गवळी गल्ली, लक्ष्मी गल्ली आणि गोजगा रोडवरील गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. ये-जा करणाऱ्यांना नाक मुठीत धरूनच फिरावे लागत आहे. गटारींमध्ये सांडपाणी, कचरा आणि माती साचून राहिल्याने गटारी तुंबल्या आहेत. दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचून राहिल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून ग्रा. पं. ना अनुदान दिले जाते. मात्र ग्राम पंचायत स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. गाव स्वच्छ करण्यासाठी घंटागाडी देण्यात आली आहे. मात्र वाहक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांअभावी घंटागाडी जागेवर पडून आहे. त्यामुळे स्वच्छतेची घंटागाडी शोभेची वस्तू ठरू लागली आहे. गोजगा-बेकिनकेरे मार्गावर कचऱ्याचा ढीग मागील काही दिवसांपासून पडून आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. शिवाय कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. गावच्या वेशीतच कचऱ्याचा ढीग साचून असल्याने सौंदर्यही धोक्यात आले आहे. ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. मात्र स्वच्छतेसाठी कोणतेच पाऊल उचलताना दिसत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
अस्वच्छता निर्माण होऊन रोगराईत वाढ
गावातील गटारी सांडपाण्यांनी तुंबल्या आहेत. गटारीतून कचरा आणि माती साचली आहे. झाडाझुडुंपानी गटारी झाकल्या गेल्या आहेत. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन रोगराई पसरली आहे. ग्रा. पं. च्या दुर्लक्षपणामुळे ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
– मारुती सावंत, ग्रामस्थ
लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्या
गोजगा-बेकिनकेरे रोडवर कचऱ्याचे ढीग पडून आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना आणि लहान मुलांनादेखील आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. रस्त्यावरच कचरा साचून असल्याने ये-जा करणेही कठीण झाले आहे. याबाबत ग्रा. पं. कडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, कोणीच याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.
– मल्लाप्पा महागावकर, ग्रामस्थ









