तलावासभोवती झाडेझुडपे वाढून सापासह विषारी प्राण्यांचा वावर
वार्ताहर/धामणे
धामणे गावच्या मध्यभागी असलेले सर्व्हे नं. 808 हा तलाव अस्वच्छतेमुळे गावच्या नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक बनल्यामुळे येथील नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गावच्या मध्यभागी असलेल्या तलावाकडे शासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे तलावाच्या सभोवताली झाडेझुडपे वाढून सापासारखे विषारी प्राण्यांचे माहेरच झाले आहे. सध्या पावसाच्या पाण्याने हा तलाव तुडूंब भरला आहे. गावच्या मध्यभागी हा तलाव असल्यामुळे लहान मुलांसाठी धोक्याचे आहे. मागील उन्हाळ्यात ग्राम पंचायतच्या रोजगार योजनेतून सभोवतालची झुडपे काढण्यात आली होती. परंतु गेल्या सात-आठ महिन्यात या झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धोका निर्माण झाला असून ग्राम पंचायतने पुढाकार घेवून तलावासंबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेवून तातडीने हा तलाव स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.
कचरा गाडी असून नसल्यासारखी
या तलावाकडे धामणे ग्राम पंचायतीचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे या तलावाभोवतालचे आणि गावातील इतर रहिवासी सध्या झाडलोट केलेला कचरा तलावाभोवती टाकत आहेत. या कचरा टाकणाऱ्यांवर ग्राम पंचायतने निर्बंध घालणे जरुरीचे आहे. नाहीतर तलावाच्या शेजारी कचराकुंडी ठेवणे गरजेचे आहे. कारण शासनाने गावातील कचरा निर्मूलनासाठी ग्राम पंचायतीला वाहन दिले आहे. सदर वाहनांतून आठवड्यातून दोनवेळा या कुंडीतील कचरा भरुन नेला तरी हा परिसर स्वच्छ राहणार आहे. परंतु शासनाकडून ग्राम पंचायतीला देण्यात आलेले हे वाहन गेल्या दोन वर्षांपासून तसेच अस्वच्छतेत उभे आहे. निदान आतातरी ग्राम पंचायतने ही उद्भवलेली समस्या दूर करण्यासाठी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









