सर्वसामान्यांची अधिकाऱयांकडून पिळवणूक : हेलपाटे मारावे लागल्याने जनता मेटाकुटीसःलोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात सामान्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येक कार्यालयात एजंटांकरवीच कामे करून घ्यावी लागत आहेत. शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱयांवर कोणत्याच लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने सर्वच कार्यालयांतील अधिकारी बे-लगाम वागत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला शासकीय कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. पैसेही खर्च करावे लागत असल्याने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. तालुक्यातील जनतेला कुणीच वाली नसल्याची अवस्था आहे.
सर्वाधिक जनतेचे काम तहसीलदार कार्यालयात असते. या कार्यालयात सर्वच विभागातील कर्मचारी सामान्य नागरिकांना योग्यप्रकारे मार्गदर्शन अथवा मदत करत नसल्याने एजंटांकरवी कामे करून घ्यावी लागत आहेत. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. महसूल विभागात शेतीविषयक कामांसाठी शेतकऱयांना वारंवार या कार्यालयात यावे लागते. छोटय़ा-छोटय़ा कामांसाठी वर्ष-दोन वर्षे धावपळ करावी लागत आहे. पैसेही मोजावे लागतात. त्यामुळे वेळ व पैसा दोन्ही खर्च होऊनही कामे वेळेवर होत नसल्याने सामान्य नागरिक कंटाळून गेला आहे.
कामकाजाला जनता वैतागली
तालुक्यातील जनता आजही शेतीबाबत जागरुक नसल्याने फोडी, रयतावा, दुरुस्ती, वाटणी, आकार दुरुस्ती, आरटीएस ऑर्डर करणे, पोकळ नाव कमी करणे, उतारा दुरुस्ती, नमुना क्रमांक 10 शेतकऱयांना मिळवून देणे यासारखी अनेक कामे ही तहसीलदार कार्यालयात करावी लागतात. परंतु या कामांसाठी शेतकऱयांना तहसीलदार कार्यालयातून योग्य माहिती दिली जात नाही. त्यामुळे त्यांना एजंटांकरवीच हे काम करून घ्यावे लागते.
यासाठी अनेक वेळा शेतकऱयांना तहसीलदार कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागून शेतकरी थकून जात आहे.
क्षुल्लक कामासाठी सहा-सहा महिने पाठपुरावा

तहसीलदार कार्यालयातील अनुभव फार वेदनादायी आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तहसीलदार कार्यालयातून कामे वेळेवर होत नाहीत. सामान्य जनतेला काय हाल सोसावे लागत असतील? क्षुल्लक कामासाठी सहा-सहा महिने पाठपुरावा करूनही कामे होत नाहीत. तालुक्यातील जनता शांत व सहनशील असल्याने अधिकारी त्यांची पिळवणूक करतात, हे दिसून येत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱयांनी कर्मचाऱयांना योग्य सूचना द्याव्यात.
– प्रकाश चव्हाण
उताऱयातील चुका दुरुस्तीसाठी वेळ-पैसा खर्च

तहसीलदार कार्यालयातील क्षुल्लक काम करून घेण्यासाठीही नाकीनऊ येत आहे. मी स्वतः शेतकरी आहे, याचा अनुभव मी अनेक वेळा घेतलेला आहे. तहसीलदार कार्यालयातून उताऱयात झालेल्या चुका दुरुस्तीसाठी पैसा व वेळ खर्च करावा लागतो. तालुक्यातील सामान्य जनतेला तहसीलदार कार्यालयातून काम करून घेणे म्हणजे उंच डोंगर किंवा टेकडी चढून जाण्यासारखे आहे.
– यशवंत बिरजs









