एकेकाळी महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र अशी अवस्था होती. आज घडीला ती राहिली नाही. त्याची अनेक कारणे असली तरी काँग्रेसला देशात आणि राज्यात पूर्वीप्रमाणे नेतृत्व राहिलेले नाही. पक्षात काळानुरुप बदल झालेले नाहीत आणि उभ्या महाराष्ट्राला गवसणी घालेल असे नेतृत्व पक्षाकडे नाही. एक काळ असा होता यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, वसंतराव नाईक अशी एकसे बढकर एक नेतेमंडळी राज्यात काँग्रेसची ध्वजा उंचावत होती. या नेतेमंडळीतही सत्तासंघर्ष व नेतृत्वासाठीची चुरस होती. पण काँग्रेसचे राष्ट्रीय नेते त्यांची कौशल्ये वापरुन सत्ता समतोल व पक्ष बळकटी राखून होते. आज या पातळीवर फारसे काही होत नाही. सगळा अंधार आहे. देशात आणि राज्यात सत्ता जाऊनही काँग्रेसमध्ये आणि त्या पक्षाच्या दरबारी राजकारणामध्ये फरक पडलेला नाही किंवा अपेक्षित शहाणपण आलेले नाही. ओघानेच बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यात जुंपली आहे. थोरात यांनी विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला अशी वार्ता असली तरी तो दिलेला नाही, असे सांगितले जात आहे. नाना पटोले हे भाजपा व प्रमोद महाजन यांच्या तालमीत तयार झालेले मल्ल आहेत. नरेंद्र मोदींना जाहीर विरोध करुन ते भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले व विधान परिषदेचे उपसभापतीपद सोडून काँग्रेसचे अध्यक्ष झाले. परखड व रेटून बोलण्यात ते माहिर आहेत. थोरात व पटोले यांच्यात जसा वाद आहे तसा काँग्रेसच्या अन्य नेत्यातही वाद आणि धुसफूस आहे. मुंबई काँग्रेसचीही वेगळी अवस्था नाही. मुंबईत आघाडीचा प्रयोग होणार की स्वतंत्र चूल मांडावी लागणार याबद्दल संभ्रम आहे. महाराष्ट्रात अभूतपूर्व व अनैसर्गिक म्हणवला गेलेला महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यामध्ये काँग्रेस सहभागी झाली होती व मंत्रीपदे भोगत होती. या मंत्रीपदाचा पक्षासाठी, पक्ष विस्तारासाठी फारसा उपयोग झाला नाही. ही मविआ शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षविस्तारासाठी वापरली हे स्पष्ट दिसत होते. त्यातूनच शिवसेनेत फूट पडली, राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत मते फुटली आणि संशयाचे वातावरण झाले. राज्यात सत्ताबदल व कोर्ट कचेऱया, दावे, खटले सुरु आहेत. त्याचे निकाल काय येतात व त्याचा सत्ताकारणावर काय परिणाम होईल याची अनेकांना भीती आहे. ओघानेच भाजपच्या रडारवर जसे काही राजकीय नेते आहेत तसे काही पक्ष आहेत. राज्यात शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र करण्याचा प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांचा प्रयोग व आंबेडकर यांची पवार व राष्ट्रवादी काँगेसवरची प्रखर टीका यामुळे ही आघाडी निवडणुकीपर्यंत टिकणार का? असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. कोथरुड व कसबा पोटनिवडणुकीत या आघाडीच्या भवितव्याची अस्पष्ट सावली दिसते आहे. त्यातच भाजपा आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना करत असून त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आमदार आपलेसे करायचे आहेत. हे जाहीर नसले तरी उघडे सत्य आहे. काही मंडळी सत्तेशिवाय जगू शकत नाहीत आणि ज्यांनी आपल्या संस्था हव्या तशा वापरल्या त्यांना ईडीची भिती आहे. ओघानेच येत्या काही महिन्यात राजकीय भूकंप होणार अशी चिन्हे आहेत. काँग्रेसमध्ये फूट पडली किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट फडली तरी आश्चर्य नको. काँग्रेसमधील काही मते विधानपरिषद व राज्यसभेच्यावेळी फुटली. त्यावेळीच पक्षात ऑलवेल नाही हे स्पष्ट झाले होते. पण काँग्रेस नेतृत्वाने ही फाटाफूट फारशी गांभिर्याने घेतली नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष सत्यजित तांबे मोठय़ा फरकाने विजयी झाले त्यामागे अनेकांचे अदृश्य हात होते. भाजपने आता तांबे, बाळासाहेब थोरात यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले आहे. पक्षाची दारे सताड उघडी ठेवली आहेत. शिंदे-फडणवीस सरकारला कोर्टाच्या निर्णयाने काही अडचण आली तर भाजप प्लॅन दोन आखून ठेवत आहे. काँग्रेसचे राज्यात जे तीन-चार नेते आहेत त्यांची तोंडे वेगवेगळय़ा दिशेला आहेत. काँग्रेसचे हायकमांडही पक्षाला व विविध गटांना हाताळण्यात यशस्वी ठरताना दिसत नाहीत. काँग्रेसचे हायकमांड फारसे प्रभावी नाहीत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहून आपल्या मनातली मळमळ व्यक्त केली आहे. सत्यजित तांबे व थोरात यांचे वेगळे नाते आहे. नाशिकच्या पदवीधरच्या काँग्रेस तिकिटावरुन थोरात-पटोले यांच्यात संघर्ष होता. त्यातून ठिणगी पडली असली तरी अंतर्गत खदखद दीर्घकाळ सुरुच होती. पक्ष नेतृत्वाने त्यावर तोडगा काढला नाही. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाचे राज्यात काय होते हे बघावे लागेल. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना बाळासाहेब थोरातांचा गटनेतेपदाचा राजीनामा आपल्याकडे आलेला नाही व बाळासाहेब राजकारण करत आहेत असे म्हटले आहे. पटोले यांनी भाजपवर खापर फोडले आहे. एकूणच काँग्रेस पक्षात प्रचंड खदखद व अस्वस्थता आहे. पक्षाचे अध्यक्ष खर्गे आणि महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी सावरासावरीसाठी प्रयत्न चालवले आहेत. वादाच्या पार्श्वभूमीवर येत्या दहा तारखेला एच. के. पाटील यांनी काँग्रेस आमदार व पदाधिकारी बैठक बोलवली आहे. या बैठकीत शक्तीप्रदर्शन आणि आरोप-प्रत्यारोप होणार की दिलजमाई हे बघावे लागेल पण सत्ता गेल्यावर काँग्रेसमधील अस्वस्थता दडून राहिलेली नाही. काँग्रेसचे युवराज भारत जोडो यात्रा करुन पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच दरम्यान महाराष्ट्रात पक्षात उभी फूट पडण्याची, भूकंप होण्याची परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि मविआच्या दृष्टीने हे फारसे चांगले नाही. आजघडीला राजकारण म्हणजे सत्ता आणि सत्तेतून राजकारण व राजकारणातून सत्ता हे सूत्र झाले आहे. ओघानेच मविआचा प्रयोग असो अथवा शिवशक्ती-भीमशक्ती युती असो अथवा वरवर साखरलेप असलेले शिंदे-फडणवीस सरकार असो सगळीकडे अस्वस्थता आणि भवितव्याची चिंता आहे.
Previous Articleदिल्ली महापौरप्रकरणी उपराज्यपालांना नोटीस
Next Article भारतीय महिला फुटबॉल संघ पराभूत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









