शिरवडे – नावेली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रकार, आमदार व्हेन्झी व्हिएगस यांच्या आकस्मिक भेटीवेळी उघड, साबांखा मंत्र्यांना डच्चू देण्याची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी शुक्रवारी शिरवडे, नावेली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला अचानक भेट दिली असता प्रक्रिया न केलेले जे सांडपाणी सोडण्यात येत आहे ते साळ नदीत जात असल्याचे आढळून आल्याने त्यांनी तेथील अधिकाऱयांना फैलावर घेतले. या प्रकारामुळे आता मंत्र्यांवर प्रक्रिया करण्याची वेळ आली आहे, असे म्हणत साबांखामंत्री नीलेश काब्राल यांना बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शिरवडे येथील सदर एसटीपी प्रकल्पाच्या यंत्रणेचा एक सुटा भाग व्यवस्थित काम करत नसल्याने सदर एसटीपी प्रकल्पाची टाकी भरून वाहते. सदर सांडपाणी एका वाहिनीतून जवळच्या शेतातील नाल्यात सोडण्यात आले आहे. पुढे सदर नाला साळ नदीला मिळतो. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याचे आमदार व्हिएगस यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण 3 मीटर उडी घेऊन नाल्यापर्यंत गेलो व सांडपाणी भरून वाहू लागल्यावर ज्या वाहिनातून ते नाल्यात जाते ते शोधून काढले असता तेथे प्रक्रिया न केलेले सांडपाणी वाहत असल्याचे आढळून आले, असे त्यांनी सांगितले.
नादुरुस्त सुटा भाग विकत घेण्यासाठी 5 लाखांचा निधी आवश्यक आहे. मात्र संबंधित खात्याला हे माहीत असूनही खात्याचे व मंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे, असा दावा आमदार व्हिएगस यांनी केला. पर्यावरण प्रदूषित करण्यास जबाबदार धरून मंत्री काब्राल यांना मंत्रिपदावरून डच्चू देण्याची मागणी त्यांनी उचलून धरली आहे. यासंदर्भात आपण नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून वरील मागणी त्यांच्याकडे केली आहे, असे आमदार व्हिएगस यांनी सांगितले.
शिरवडे येथे दोन एसटीपी प्रकल्प आहेत व नवीन एसटीपी प्रकल्पात दोष असल्याने त्या टाकीतून सांडपाणी प्रक्रिया न होता भरून वाहत आहे. हा सर्व प्रकार आपण प्रकल्पांचे आराखडा पाहून घेतल्यानंतर लक्षात आला व त्यातून सांडपाणी नदीत जात असल्याचे कळून चुकले. सकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकानेही या प्रकल्पाला भेट दिली होती असे आपणास कळले असून त्यांना या प्रदूषणाचा उलगडा झाला की नाही हे माहीत नाही. कारण भरून वाहणारे सांडपाणी जाण्यासाठीची वाहिनी अशा ठिकाणी सोडली आहे की, तेथे नाल्यातून उडी टाकून जावे लागते, याकडे आमदार व्हिएगस यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी एसटीपी प्रकल्पावरील अधिकाऱयाला या गैरप्रकाराबद्दल चांगलेच फैलावर घेतले.









