उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुखरुप बाहेर, 17 दिवसांचे अथक परिश्रम अंतिमत: सफल
वृत्तसंस्था / उत्तरकाशी
उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी येथील सिल्क्यारा येथे बोगदा कोसळल्याने आत अडकलेल्या 41 सर्व कामगारांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री साधारण साडेदहा वाजता सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यांना सुखरुप परतल्याचे पाहून त्यांच्या आप्तेष्टांच्या आनंदाला उधाण आल्याचे दिसून येत होते. 17 दिवसांच्या अखंड आणि अथक परिश्रमांनंतर हे यश मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपदा निवारण दलाचे मन:पूर्वक अभिनंदन करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी सुखरुपपणे वाचलेले सर्व कामगार आणि त्यांच्या आप्तेष्टांनाही शुभेच्छा दिल्या आहेत
सर्व कामगारांना अत्यंत दक्षतापूर्वक बाहेर काढायचे असल्याने हे कार्य करताना कोणतीही घाई केली जाणार नाही, असे राष्ट्रीय आपदा निवारण दलाच्या अधिकाऱ्यांनी आधीच स्पष्ट केले होते. कदाचित मंगळवार आणि बुधवार यांच्यातील संपूर्ण रात्र या कामासाठी लागू शकेल, असेही त्यांचे म्हणणे होते. तथापि, त्यांच्याही अपेक्षेपेक्षा अनेक तास आधीच, अर्थात, मंगळवारी रात्री 7 वाजून 50 मिनिटांनीच प्रथम कामगार बोगद्याबाहेर आला होता. सर्व 41 कामगारांना त्यानंतरच्या 35 मिनिटांमध्येच बोगद्याबाहेर काढण्यात आले. खोदकामाचा शेवटचा दोन मीटरचा खोदकामाचा टप्पा मंगळवारी संध्याकाळी पूर्ण झाला. त्यानंतर बोगद्यात उतार निर्माण करुन एका एका कामगाराला स्टेचरवर झोपवून बोगद्यातून बाहेर काढण्याच्या नाजूक प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला.

17 दिवसांचे प्रयत्न
12 नोव्हेंबरला सिल्क्यारा येथील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली होती. त्यामुळे त्याचे बाहेर येण्याचे तोंड बंद झाले होते. त्यावेळी आत 41 कामगार निर्मिती कार्य करीत होते. त्यांचा बाहेर येण्याचा मार्ग बंद झाल्याने ते आतच अडकून पडले. या दुर्घटनेचे वृत्त समजताच त्वरित राष्ट्रीय आपदा निवारण दलाच्या उत्तराखंडातील दलांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी 17 दिवस अखंड परिश्रम करुन ही जटील आणि नाजूक कामगिरी अखेर पार पाडली.
अनेकदा प्रयत्न असफल
या 17 दिवसांमध्ये अनेकवेळा या अभियानात चढउतार निर्माण झाले होते. तीन वेळा ड्रिलिंग मशिन बंद पडल्याने काम थांबवावे लागले होते. आतील कामगारांच्या मनोधैर्याचा आणि शरीर प्रकृतीचाही प्रश्न होता. तथापि, दुर्घटना घडल्यानंतर त्वरित त्यांच्याशी बाहेरुन संपर्क स्थापन करण्यात यश मिळाल्याने बाहेरुन त्यांच्याशी बोलून त्यांचा धीर सुटू नये याची दक्षता घेण्यात आली होती.
ऑगर मशिन बंद पडल्याने समस्या
या सुटका कार्यासाठी अमेरिकेहून विशेष उच्च शक्तीचे ऑगर ड्रिलिंग मशिन मागविण्यात आले होते. या मशिनच्या साहाय्याने ड्रिलिंग करण्यात यश मिळत असतानाच 24 नोव्हेंबरला हे मशिन बोगद्याच्या कोसळलेल्या ढिगाऱ्यात अडकले होते. त्यामुळे ते नंतर तोडून बाहेर काढावे लागले. यामुळे दोन दिवस खोदकाम थांबवावे लागले होते. नंतर मात्र कामाला मोठा वेग आला होता.

अखेर जुगाडच आला कामी
यांत्रिक उपायांचा उपयोग होत नाही असे लक्षात आल्यानंतर रॅट मायनिंगचा जुगाड करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारच्या खोदकामावर, ते धोकादायक असल्याने केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तथापि, शेवटचा उपाय म्हणून रॅट मायनर्सना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी तीन दिवसांमध्ये अरुंद जागेतून धोका पत्करुन हात आणि छोट्या कुदळीने सावकाशपणे भुयार खोदत कामगारांपर्यंत जाण्याचा मार्ग निर्माण करुन दिला. प्रत्येक वेळी थोडे भुयार खोदल्यानंतर यात 80 ते 90 सेंटीमीटर रुंदीचे पोलादी पाईप बसविण्यात येत होते. त्यामुळे पोखरलेल्या भुयारात पुन्हा माती पडून ते बंद होण्याचा धोका टाळण्यात आला. परिणामी, अखेर कामगारांपर्यंत पोहचण्यात यश मिळाले.
उताराचे निर्माणकार्य
मंगळवारी संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी शेवटचा, कामगारांपर्यंत पोहचलेला पाईप बसविण्यात आला होता. त्यामुळे या अभियानातील मुख्य भाग पूर्ण झाला होता. त्यानंतर शेवटचा पाईप ते बोगद्याचा तळ असा उतार किंवा रँप निर्माण करण्यात आला. त्याआधीच राष्ट्रीय आपदा निवारण व्यवस्थापन दलाचे कर्मचारी कामगारांपर्यंत पोहचले होते. अशा दोन अनुभवी कर्मचाऱ्यांना आत पाठविण्यात आले होते. त्यांनी कामगारांची विचारपूस केली. त्यांची स्थिती तपासली. नंतर एकावेळी एका कामगाराला स्टेचरवर निजवून त्याला पाईपलाईनमधून सावकाश बाहेर काढण्याच्या कार्याला प्रारंभ करण्यात आला. रात्री आठ वाजेपर्यंत दोन कामगारांना यशस्वीरित्या बाहेर काढल्यानंतर हे अभियान यशस्वी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. साधारणत: पाच मिनिटांनी एक कामगार अशा वेगाने साधारणत: दोनशे ते सव्वादोनशे मिनिटांमध्ये (साधारणत: सव्वातीन तास) सर्व कामगारांना बाहेर काढले जाणार होते. तथापि, संपूर्ण अभियान मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्याही आधी पूर्ण करण्यात आले होते.
प्रतिदिन सकाळी सात वाजता…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व साहाय्यता आणि आपदा निवारण कार्यावर प्रारंभापासून लक्ष ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोठेही असले तरी प्रतिदिन सकाळी सात वाजता त्यांची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्यासह चर्चा होते. धामी त्यांना निवारण कार्याची माहिती देतात. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळावरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर तासाला माहिती दिली जाते.
आप्तेष्टांचा जल्लोष
गेले 17 दिवस आपल्या आत अडकलेल्या नातेवाईकाच्या सुटकेची आर्तपणे आणि आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या आप्तेष्टांनी प्रथम कामगार बाहेर आल्यानंतर जल्लोष केला. तथापि, त्वरीत त्यांना कामगारांना भेटू देण्यात आले नाही. नियमाप्रमाणे प्रथम सर्व कामगारांना, त्यांच्यासाठी उत्तरकाशीत निर्माण करण्यात आलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची सखोल शारिरीक आणि मानसिक तपासणी करण्यात आली. नंतर त्यांना नातेवाईकंना भेटण्याची अनुमती राज्य सरकारकडून देण्यात आली होती.
सर्व कामगार सुरक्षित
17 दिवसांच्या या अग्नीपरीक्षेनंतरही सर्व कामगार सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले. मंगळवारी रात्री उशीरा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी कामगार आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची विचारपूस केली. रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी बोगद्यातून सात कामगारांना बाहेर काढण्यात यश आले होते. त्यांना बाहेर काढण्याचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त राहिला, अशी माहिती आपदा निवारण दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
उपचारांची विशेष व्यवस्था
अभियान यशस्वी ठरण्याआधीच बाहेर आलेल्या कामगारांच्या आरोग्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सिल्क्यारी येथे एक तात्पुरते रुग्णालय स्थापन करण्यात आले होते. तर उत्तरकाशी येथील सरकारी रुग्णालयात 41 खाटांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कोणत्याही कामगाराला कोणताही त्रास होत असेल तरी त्यावर उपचारांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. तथापि, बऱ्याच कामगारांची प्रकृती उत्तमच राहिल्याने त्यांना रुग्णवाहिकेचीही आवश्यकता लागली नाही. अनेक कामगार तर थेट नातेवाईकांनाच भेटले.
मंगवारी दिवसभरात…
सकाळी 8 वाजता : रॅट मायनिंग कामाला नव्या जोमाने प्रारंभ, रात्रभरच्या कामात 20 मीटर्सचे खोदकाम करण्यात आले होते पूर्ण
सकाळी 10 वाजता : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांची घटनास्थळाला भेट, साहाय्यता कार्याची घेतली माहिती
दुपारी 12 वाजता : केवळ तीन मीटरचे खोदकाम शिल्लक उरल्याचे करण्यात आले स्पष्ट, अभियान होते यशस्वी होण्याच्या मार्गावर
दुपारी 2 वाजता : कामगारांच्या नातेवाईकांना जमा होण्यास सांगण्यात आले. काहींना बोगद्यानजीक जाण्याची अनुमती देण्यात आली.
दुपारी 4 वाजता : केवळ एक मीटर अंतरावर पोहचले रॅट मायनर्स. आता उरला होता काही क्षणांचाच अवधी. शुभवार्ता ऐकण्यासाठी सारे सज्ज
ड दुपारी 4.45 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुष्कर धामींकडे परिस्थितीसंबंधी विचारणा. अभियान यशस्वीतेकडे चालल्याची माहिती.
ड संध्याकाळी 5 वाजता : डॉक्टर्स, रुग्णालयाचे कर्मचारी यांना सज्ज होण्याची सूचना. कोणत्याही क्षणी अभियान यशस्वी होईल असा निरोप
ड संध्याकाळी 6 वाजता : अभियान पूर्णतेच्या मार्गावर. एक फूटाचाच होता प्रश्न. यशस्वीतेच्या संदेशाची देवाणघेवाण होण्यास झाला प्रारंभ
ड संध्याकाळी 6.15 वाजता : राष्ट्रीय आपदा दलाचे कार्मचारी कामगारांना भेटण्यासाठी आत. उतार बनविण्याच्या कार्याला केला प्रारंभ
ड संध्याकाळी 7.30 वाजता : अभियान पूर्ण झाल्याचा संदेश. कामगारांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ, स्टेजरची आधीच व्यवस्था
ड संध्याकाळी 7.56 वाजता : प्रथम कामगाराला काढले बोगद्याबाहेर. त्यानंतर केवळ साधारणत: अर्ध्या तासातच सर्व 41 कामगारांची सुटका
ड रात्री 8.28 वाजता : सुटका अभियान पूर्ण झाल्याचा शुभसंदेश. राष्ट्रीय आपदा निवारण दलावर सर्वांकडून कौतुक, अभिनंदनाचा वर्षाव









