कराड :
हजारमाची (ता. कराड) गावच्या विभाजनासाठी सोमवारी बोलावलेल्या ग्रामसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. प्रचंड तणाव निर्माण झाल्याने अखेर पोलिसांनी बळाचा सौम्य वापर करत जनमत आजमावण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मतदानात स्वतंत्र सदाशिवगड ग्रामपंचायतीच्या बाजूने 1 हजार 280 ग्रामस्थांनी मतदान केले तर अखंड गावच्या बाजूने 1 हजार 532 ग्रामस्थांनी मतदान केले. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर स्वतंत्र सदाशिवगड गावची मागणी करणाऱ्या गटासह सरपंचानीच निकाल अमान्य करीत गटविकास अधिकारी प्रताप पाटील व ग्रामसेवक अनिल जाधव यांना धारेवर धरले. यानंतर सरपंच निर्मला जिरगे यांनी या ग्रामसभेत नियमाचे पालन न झाल्याने ती रद्द करीत असल्याचा निर्णय घेतला.
राजकीयदृष्टया संवेदनशील असलेल्या हजारमाची गावचे विभाजन करून दीपाच्या ओढयाच्या पश्चिमेकडील भागाला स्वतंत्र सदाशिवगड महसूली गावचा दर्जा मिळावा, याबाबत मागणी करण्यात आली होती. गावाच्या विभाजनावर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जनमत आजमवण्यासाठी सोमवारी दुपारी साडेबाराला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच निर्मला जिरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. खबरदारी म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गावच्या विभाजनाच्या मुद्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून गावातील वातावरण ढवळून निघाले होते. विभाजनाची मागणी व विरोध करणाऱ्या दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ येणार असल्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य मंडप व जळपास साडेतीन हजार खुर्चांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 10 वाजल्यापासून सभास्थळी ग्रामस्थ यायला सुरवात झाली. सभामंडपात विभाजनाच्या बाजूने व विरोधातील ग्रामस्थांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला 3 हजार 159 ग्रामस्थांची नोंद करण्यात आली. यात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.
ग्रामसभेच्या कामकाजास प्रत्यक्षात सुरवात करण्यापूर्वी जोरदार पावसाने सुरवात केल्याने मंडपाचे छत उडाल्याने ग्रामस्थांत प्रचंड गोंधळ उडाला. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक ग्रामस्थांनी आसरा शोधला. पाऊस उघडल्यानंतर पुन्हा ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्यात आले. मात्र उपस्थित ग्रामस्थांची संख्या व पंचायत प्रशासनाचे ढिसाळ नियोजन यामुळे गोंधळ अधिकच वाढत गेला. अखेर कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार व ओगलेवाडी पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर ग्रामसभा सुरू झाली.
प्रथम गावच्या विभाजनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची बीएलओमार्फतमोजणी करण्यात आली. यानंतर स्वतंत्र सदाशिवगड गावाची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांची मोजणी करण्यात आली. जनमत घेण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑन पॅमेरा करण्यात आली आहे. दुपारी दोनच्या सुमारास दोन्ही बाजूचे जनमत घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यानंतर पाच वाजण्याच्या सुमारास गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच निर्मला जिरगे यांच्या परवानगीने ग्रामसेवक अनिल जाधव यांनी निकाल जाहीर केला, यात स्वतंत्र सदाशिवगडच्या मागणीच्या बाजूने 1 हजार 280 तर विभाजनाच्या विरोधात 1 हजार 532 ग्रामस्थांनी मतदान केले.
- आकडेवारीत तफावत, अधिकाऱ्यांना घेराव
ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला 3 हजार 159 ग्रामस्थांची नोंद असताना 2 हजार 812 ग्रामस्थांचे प्रत्यक्ष जनमत नोंदवल्याचे समोर आल्यामुळे स्वतंत्र गावची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी प्रताप पाटील व ग्रामसेवक अनिल जाधव यांना घेराव घालत आकडेवारीतील तफावतीबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. यावर रजिस्टरला नोंद केल्यानंतर पाऊस आल्याने काही ग्रामस्थ परत गेल्याचा खुलासा ग्रामसेवक जाधव यांनी केला. मात्र जनमत घेतलेल्या आकडेवारीच्या बेरजेतही तफावत असल्याने ही ग्रामसभा मान्य नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
- पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका
सोमवारी ग्रामविकास मंत्र्यांची बैठक असल्याने गटविकास अधिकारी प्रताप पाटील सातारला गेले होते. तर पंचायत समितीच्या वतीने या ग्रामसभेसाठी प्रशिक्षणार्थी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रसाद खेडेकर यांच्यासह 4 विस्तारअधिकारी व 8 ग्रामसेवकांची नेमणूक केली होती. ग्रामसभेत जनमत घेताना प्रचंड गोंधळ सुरू होता तर बीएलओंची दमछाक झाली होती, असे असताना दोन ते तीन अधिकारी वगळता बाकीच्या अधिकाऱ्यांनी खुर्चीत बसून बघ्याची भूमिका घेतली. दुपारनंतर गटविकास अधिकारी सभास्थळी आल्यानंतर हे अधिकारी महाशय जागेवरून उठले. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
- सरपंचांना निकाल अमान्य
सोमवारची ग्रामसभा सरपंच निर्मला जिरगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेचे संपूर्ण नियोजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर स्वतंत्र सदाशिवगडची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांसह सरपंच निर्मला जिरगे यांनी निकाल अमान्य असल्याचे सांगितले आहे. याबाबत बोलताना सरपंच जिरगे म्हणाल्या की, जनमत घेण्यासाठी आयोजित ग्रामसभेत मतपत्रिका तपासून ग्रामस्थांना प्रवेश द्यावयाचा होता, मात्र तसे झाले नाही. निकालाच्या आकडेवारीत तफावत आहे. तसेच निकालावर सही करण्यासाठी अधिकाऱ्यांनी दबाव आणला. त्यामुळे ही ग्रामसभा मान्य नसून याबाबत पुन्हा ग्रामसभा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
- ग्रामपंचायत व प्रशासनाचे ढिसाळ नियोजन
ऐन पावसाळयात ग्रामसभा घेत असताना रस्त्यावर प्लास्टिकचा कागद टाकून मंडप उभारण्यात आला होता. ग्रामसभेचे कामकाज सूरू होण्यापूर्वीच आलेल्या पावसाने मंडपावरील कागद उडाला. यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. उपस्थित ग्रामस्थांची संख्या पाहता मंडप अपुरा पडला. ग्रामसभेसाठी सकाळी 10 वाजल्यापासून महिला व ग्रामस्थांनी उपस्थिती लावली मात्र जनमत घेण्याची प्रक्रिया दुपारी जवळपास 3 पर्यंत चालल्याने महिला व त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
- पोलिसांचे कौशल्य पणाला
गावच्या विभाजनाचा मुद्दा असल्याने सभास्थळी सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. त्यातच पंचायत प्रशासन अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार व सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळी यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळत जनमत सभा पार पाडली. सभेदरम्यान गोंधळ करणाऱ्या काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र सभा संपल्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले.








