भाजपार्तंगत वादावर पडदा
वास्को : मुरगावच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक रामचंद्र कामत यांची अखेर बिनविरोध निवड झाली. भाजपाच्याच समर्थक नगरसेवकांनी उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केल्याने पालिका मंडळातील भाजपासमर्थकांमध्ये फुट पडण्याची शक्यता होती. मात्र, वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी या प्रकरणात केलेली शिष्टाई सफल झाली. त्यांच्या दाबोळी मतदारसंघातील नगरसेवक विनोद किनळेकर यांनी निवडणुकीतून घेतल्याने भाजपामधील फुट टळली. मुरगावचा नवीन उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी काल मंगळवारी मुरगाव पालिका मंडळाची पालिका सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. उपनगराध्यक्षपदासाठी विनोद किनळेकर व रामचंद्र कामत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोघेही नगरसेवक भाजपा समर्थक आहेत. त्यामुळे भाजपासमर्थकांमध्ये तेढ निर्माण झाली होती. मात्र, उपनगराध्यक्षपदावरून निर्माण झालेला अंतर्गंत वाद अखेर सामंजस्याने मिटला. दाबोळीचे आमदार व वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांची शिष्टाई सफल ठरली. त्यांनी रामचंद्र कामत व विनोद किनळेकर समर्थक नगरसेवकांना एकत्र आणून समोपचाराने तोडला काढला. पालिका मंडळाची बैठक सुरू झाल्यानंतर विनोद किनळेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन रामचंद्र कामत यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. किनळेकर यांनी निवडणुकीतून माघार घेताच बैठकीचे अध्यक्ष व निर्वाचन अधिकारी भगवंत करमली यांनी उपनगराध्यक्षपदी कामत यांची बिनविरोध निवड जाहीर केली. किनळेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली नसती तर भाजपा समर्थक नगरसेवकांमध्येच फुट पडली असती आणि हरणाऱ्या गटाला खजिल व्हावे लागले असते. मुरगावच्या उपनगराध्यक्षपदावरून गेले काही दिवस वास्को, मुरगाव व दाबोळी मतदारसंघातील भाजपामध्ये राजकीय दबाव, कुरापती व इतर घडामोडींना बराच वेग आला होता. मात्र अखेर हा प्रश्न समोपचाराने मिटला. रामचंद्र कामत हे विद्यमान पालिका मंडळाचे तिसरे उपनगराध्यक्ष आहेत.
नगरसेवकांनी घेतली मंत्री माविन गुदिन्हो व सदानंद तानावडे यांची भेट
पालिका मंडळाच्या बैठकीला वास्कोचे आमदार दाजी साळकर उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदाची निवडणुक बिनविरोध झाल्याने भाजपा नगरसेवकांची एकजुट कायम असल्याचे स्पष्ट झाल्याचे आमदार दाजी साळकर म्हणाले. बिनविरोध निवड करून भाजपाने पक्षामधील शिस्त दाखवून दिली आहे असे नुतन उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत म्हणाले. मंगळवारी दुपारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह मुरगावच्या बहुसंख्य नगरसेवकांनी मंत्री माविन गुदिन्हो व भाजपा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची भेट घेतली. यावेळी वास्कोचे आमदार दाजी साळकर व मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर उपस्थित होते. पुढील काही महिन्यात मुरगावच्या नगराध्यक्षपदासाठीही वास्को मुरगाव व दाबोळीमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.









