शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : यमकनमर्डी अर्बन को. ऑप. सोसायटीकडून काही शेतकऱ्यांनी जनावरे खरेदी करण्यासाठी कर्ज काढले होते. कर्जाचे काही हप्ते भरलेत तरीही बँक कर्मचाऱ्यांकडून कर्जफेडीसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांविरोधात न्यायालयात खटलादेखील दाखल केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी समस्या झाली आहे. तरी बँकेवर वेळीच आळा घालून त्यांना कर्ज वसुलीचा तगादा लावू नये, अशी सूचना देण्याची मागणी राज्य शेतकरी संघटनेतर्फे केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
2001 मध्ये अगसगेतील काही शेतकऱ्यांनी म्हशी खरेदी करण्यासाठी बॅँकेकडून 12 हजाराचे कर्ज घेतले होते. बँकेच्या नियमानुसार शेतकऱ्यांनी हप्ताही भरला होता. मात्र शेतकऱ्यांना पैसे भरल्याची पावती दिली नव्हती. जेव्हा 2004 मध्ये शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही तेव्हा बँक कर्मचारी शेतकऱ्यांची जनावरे घेऊन जाण्यास आले. त्यावेळी शेतकरी संघटनेतर्फे जनावरांना मुक्त करून शेतकऱ्यांच्या ताब्यात दिले होते. शेतकऱ्यांनी जनावरांवर विमादेखील काढले होते. मात्र सदर जनावरे हयात नाहीत. तरीदेखील बँक कर्मचाऱ्यांकडून कर्जफेडीचा तगादा शेतकऱ्यांकडे लावण्यात येत आहे.









