45-60 वयोगटासाठी निर्णय : वृद्ध अविवाहितांच्या मागणीवर खट्टर सरकारचा निर्णय
► वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणात लवकरच अविवाहितांना पेन्शन मिळणार आहे. एका 60 वर्षीय अविवाहित वृद्धाच्या मागणीवर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला आहे. 45-60 या वयोगटातील अविवाहित पुरुष आणि महिलांना याचा लाभ मिळणार आहे. वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या अविवाहितांनाच ही पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेचा राज्यातील 1.25 लाख अविवाहितांना लाभ मिळणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री खट्टर यांनी या योजनेची रुपरेषा तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. एक महिन्याच्या आत हरियाणा सरकार ही योजना लागू करणार आहे. अविवाहितांना पेन्शन देणारे हरियाणा हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे.
हरियाणात सध्या वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग पेन्शन दिली जाते. तर ठेंगणे अन् किन्नर लोकांना हरियाणा सरकार आर्थिक मदत उपलब्ध करते. याचबरोबर सरकार केवळ मुली असलेल्या आईवडिलांपैकी एकाचे निधन झाल्यास 45-60 वयापर्यंत आर्थिक स्वरुपात 2,750 रुपये देत आहे. अविवाहितांना देखील सरकार 2,750 रुपयांची पेन्शन देणार असल्याचे मानले जात आहे.
हरियाणात अविवाहितांसाठी पेन्शन सुरू करण्याचा निर्णय तेथील बिघडलेल्या लिंग गुणोत्तरामुळे घेण्यात आल्याचे मानले जातेय. मागील 10 वर्षांमध्ये हरियाणातील लिंग गुणोत्तरात 38 अंकांची सुधारणा झाली आहे. 2011 मध्ये राज्यातील लिंग गुणोत्तर 879 इतके होते. तर 2023 मध्ये एक हजार मुलांमागे मुलींची संख्या 917 वर पोहोचली आहे.
हरियाणात अविवाहितांसोबत गरीब विधुरांना पेन्शन देण्याचाही विचार करण्यात येत आहे. प्रत्येक राज्यात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला विधवा पेन्शनच्या स्वरुपात आर्थिक मदत केली जाते. या रकमेच्या मदतीने संबंधित महिलेला काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळतो. याचमुळे पुरुषांना देखील मदत करण्याच्या उद्देशाने सरकार विधुर पेन्शन देण्याचा विचार करत आहे.









