इस्रोची तयारी अंतिम टप्प्यात : ऑक्टोबर अखेरीस प्रात्यक्षिक
► वृत्तसंस्था/ बेंगळूर, श्रीहरिकोटा
चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 च्या यशानंतर इस्रो आता गगनयान मोहीम अवकाशात पाठवण्याच्या तयारीत आहे. इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच या मोहिमेच्या मानवरहित उड्डाणाची चाचणी घेतली जाणार आहे. इस्रो या महिन्याच्या अखेरीस चाचणीसाठी विकसित केलेल्या गगनयानमधून अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी ‘क्रू एस्केप सिस्टम’ची चाचणी घेण्याची योजना आखत आहे.
इस्रोने शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.35 वाजता ट्विट करत याबाबत माहिती दिली. यामध्ये इस्रो गगनयान मोहिमेसाठी मानवरहित उ•ाण चाचणी करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इस्रोने फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) साठी तयारी सुरू केली असून या चाचणीमधून ‘क्रू एस्केप सिस्टीम’ची कार्यक्षमता सिद्ध होणार आहे. ‘क्रू एस्केप सिस्टम’ (सीईएस) हा गगनयानचा महत्त्वाचा घटक आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘टीव्ही-डी1’ची चाचणी या महिनाअखेरीस केली जाणार आहे. यानंतर, दुसरे चाचणी वाहन ‘टीव्ही-डी2’ आणि पहिले मानवरहित गगनयान (एलवीएम3-जी1) चाचणी केली जाईल. दुसऱ्या टप्प्यांतर्गत चाचणी वाहन मोहीम (‘टीव्ही-डी3’ आणि ‘टीव्ही-डी4’) आणि एलवीएम3-जी2 रोबोटिक पेलोडसह पाठवण्याची योजना आहे.
गगनयान कार्यक्रमांतर्गत अशाप्रकारच्या चार चाचण्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. इस्रोने 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये या मोहिमेशी संबंधित काही छायाचित्रे शेअर केली आहेत. इस्रोची गगनयान मोहीमही खूप खास आहे. याद्वारे अंतराळात मानवाला पाठवण्याची योजना आहे. यापूर्वी चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 मोहिमा मानवरहित होत्या. आता इस्रोला अंतराळात मानव पाठवायचा आहे. या मोहिमेच्या यशानंतर भारत अंतराळ विज्ञान क्षेत्रात आणखी एक भक्कम कामगिरी नोंदवेल.
श्रीहरिकोटा येथे पोहोचली उपकरणे
गगनयान मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे. वाहन प्रणालीचे सर्व भाग (लाँचसाठी) श्रीहरिकोटा येथे पोहोचले आहेत, असे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक एस उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितले. वेगवेगळ्या उपकरणांचे भाग जोडण्याचे काम सुरू आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस आम्ही चाचणी करण्याची तयारी करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. क्रू एस्केप सिस्टम (सीईएस) हा गगनयानचा महत्त्वाचा घटक आहे. या महिन्यात ‘टीव्ही-डी1’ वाहनाची चाचणी केली जाणार आहे. हे प्रात्यक्षिक गगनयान कार्यक्रमाअंतर्गत चार चाचणी मोहिमांपैकी एक असल्याचे इस्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले.









