निद्रानाश व शांतताभंग होत असल्याचा स्थानिकांचा आरोप
वाळपई / प्रतिनिधी
बेळगाव भागातून येणारी विनापरवाना व अवजड वाहने होंडा गावकरवाडा येथे गुरुवारी रात्री नागरिकांनी रोखून धरली. यामुळे दोन्ही बाजुनी रात्री उशिरापर्यंत लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक होऊन या भागातून पुन्हा अवजड वाहतूक झाल्यास रोखून धरण्यात येईल, असा इशारा दिला.
गोवा-बेळगाव दरम्यानची वाहतूक चोर्ला भागातून होत आहे. मात्र हैदराबाद बेंगलोर, उडपी, पुणे अशा अनेक ठिकाणी लांब पल्ल्यांच्या वाहनांचा प्रवास साखळी भागातून होंडा भागातील गावकरवाडा या मार्गावर होत असतो. सदर रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावरून वाहतूक करण्यास अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र हा बंदीचा आदेश झुगारून गावकरवाडा येथूनव् सदर ााहतूक होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संतप्त बनलेल्या नागरिकांनी गुरुवारी रात्री ही वाहतूक रोखून धरली. यामध्ये अवजड मालवाहतुकीचे ट्रक व लांब पल्ल्याच्या प्रवासी गाडय़ांचा समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे यावेळी 108 रुग्णवाहिका अडकून पडल्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
दरम्यान भागातील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातून अवजड वाहतूक करण्यास परवानगी नाही. मात्र पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाचा हलगर्जीपणामुळे या भागातून सातत्याने अवजड वाहतूक होत आहे. महत्त्वाचे म्हणजे संध्याकाळच्यावेळी ही वाहतूक सुरू होती व सकाळी पहाटे पर्यंत ती सुरू असते. यामुळे सदर भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घरातील नागरिकांची झोपमोड होत असते. सदर भागातून अशा प्रकारच्या वाहतुकीला प्रतिबंध करावा अशी मागणी अनेक वेळा केली. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केली आहे.
सदर भागातील ग्रामस्थांनी वाहतूक रोखून धरल्यामुळे रात्री उशिरा पर्यंत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. गोव्यातून परराज्यात जाणाऱया लांब पल्ल्याच्या प्रवासी बसेस अडकून पडल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान रात्री उशिरा पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही परिस्थितीत या भागातून अशा प्रकारची वाहतूक करू देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.









